नवी दिल्ली : संपूर्ण दक्षिण आशियात भारताला घेरण्याचा प्रयत्न चीनकडून सातत्याने केला जात असल्याचे वेळोवेळी उघड होत आले आहे. आता अशाच प्रकारची एक बातमी समोर आली आहे की चीनने भारताच्या भागातील हेरगिरी केली आहे. त्या देशाच्या जियाग हाग यांग ०३ या जहाजाने भारतासाठी व्यूहात्मक दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या बंगालच्या उपसागरात आपले सर्वेक्षण पूर्ण केले असल्याचे या बातमीत म्हटले आहे. चीनचे हे जहाज १३ जुलै रोजी अंदमान निकोबार बेटांच्या खालच्या भागातून हिंदी महासगरात प्रवेशकर्ते झाले होते. विशेष म्हणजे त्याच सुमारास भारत आपल्या अण्वस्त्रवाहु क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याची तयारी करत होता. त्यामुळे या घटनेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
स्वतंत्रपणे काम करणारे इंटेलिजन्स एक्स्पर्ट डेमियन सायमन यांनीच सोशल मीडियावर हा दावा केला आहे. या भागात चीनचे टेहळणी करणारे जहाज दिसणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या महिनाभरात चीनचे अशा प्रकारे येणारे हे तिसरे जहाज असल्यामुळे भारताच्या काळजीत भर पडणार आहे. माहिती देणाऱ्या सायमन यांनी सोशल मीडियावर एक नकाशाही टाकला असून त्यात चीनने कोणत्या मार्गाने कसा प्रवेश केला हे दर्शवले आहे. या नकाशात दर्शवल्यानुसार चीनने ३ ते १३ जुलै रोजी या काळात हिंदी महासागरात प्रवेश केला होता. त्यानंतर हेच जहाज १६ जुलै रोजी श्रीलंकेजवळ दाखल झाले होते. त्यानंतर जहाजाचे तोंड बंगालच्या उपसागराकडे वळवण्यात आले व २६ तारखेला त्याने बंगालच्या उपसागरात प्रवेश केला. यातील धक्कादायक बाब म्हणजे २८ जुलै रोजी हे जहाज भारताच्या चेन्नईपासून केवळ २६० सागरी मैल अंतरावर होते.
भारताच्या सर्व किनारपट्टी भागात जवळपास तीन दिवस या चीनी जहाजाची उपस्थिती होती. त्यानंतर ३१ जुलै रोजी हे जहाज शेवटचे दिसले. चीनचे हे हेरगिरीचे जहाज कथितपणे मालदीवला जात होते असे सांगितले जाते आहे. या जहाजाने या वर्षभरात तीन वेळा मालदीवच्या सागरी हद्दीत प्रवेश केला आहे. मालदीच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेच अगोदर जानेवारी महिन्यात आणि त्यानंतर एप्रिल महिन्यात या जहाजाला थांबण्याची परवानगी दिली होती. महत्वाची बाब म्हणजे भारताने मालदीव असो अथवा श्रीलंका, त्यांच्या बंदरांवर चीनी जहाजांना परवानगी देण्याच्या हालचालींवर आपली नाराजी पूर्वी जाहीर केली आहे. मात्र तरीही चीन आपल्या मनसुब्यांमध्ये यशस्वी होताना दिसतो आहे. भारताच्या सागरी भागाची चीनकडून हेरगिरी होण्याचा प्रकार म्हणजे हा भारतासाठी मोठा धोका आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळेच भारत आता चीनच्या अशा कारस्थानांना कसे उत्तर देतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.