#wari 2019 : पालखी सोहळ्यासाठी पोलिसांचा खडा पहारा

वारी मार्गावर 1400 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त

विविध पथके तयार

पालखी सोहळ्यासाठी या मुख्य बंदोबस्ताबरोबरच पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृतीदल, दंगा काबू पथक, बॉम्ब शोधक-नाशक पथक तयार असणार आहे. ही सर्व पथके दोन दिवसांपूर्वीच शहरात दाखल झाली आहेत. या व्यतिरिक्‍त पालखी सोहळ्यात गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी साध्या वेशात पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. पालखी सोहळ्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस विभागाने जय्यत तयारी केली आहे.

मागील वर्षीपर्यंत तैनात असायचे 2200 पोलीस

देहूगाव ते निगडी भक्‍ती-शक्‍ती चौकापर्यंत आत्तापर्यंत ग्रामीण पोलीस दलाचा बंदोबस्त तैनात असायचा. भक्‍ती-शक्‍ती चौकापासून पुढे हडपसरपर्यंत पुणे शहर पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात येत होता. यंदा पिंपरी-चिंचवड आयुक्तालय झाल्यामुळे देहूगाव ते हॅरिस पुलापर्यंत नव्या आयुक्‍तालयाचा बंदोबस्त तर पुढे हडपसरपर्यंत पुणे शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. मागील वर्षापर्यंत सुमारे 2200, पोलिसांचा फौजफाटा पालखी सोहळ्यासाठी देहूगाव ते हॅरिस पुलापर्यंत नेमलेला असायचा. यंदा तो 1400, इतका झाला आहे. यामुळे तीन दिवस आणि रात्र या दोन टप्प्यांत बंदोबस्ताची विभागणी केली आहे.

पिंपरी – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज मंगळवार (दि.25) रोजी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होत असून पालखी सोहळ्यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिसांचा पालखी मार्गावर खडा पहारा राहणार आहे.

या सोहळ्यावर स्वत: पोलीस आयुक्‍तांबरोबरच, पोलीस उपायुक्‍त, सहाय्यक पोलीस आयुक्‍त, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांचा खडा पहारा राहणार आहे. याबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारीही साध्या वेशात पालखीत सहभागी होवून नजर ठेवणार आहेत. त्यामुळे, स्वतंत्र आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी पोलिसांनी संपूर्ण तयारी केल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवार दि. 25 जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होत आहे. या पालखी सोहळ्यासाठी यावर्षी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून पहिल्यांदाच बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज दाखल होणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 1400 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्‍त श्रीकांत पाटील, वाहतूक विभागाच्या सहायक आयुक्‍त नीलम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक/फौजदार यांची नेमणूक करण्यात आली आहे.

या आधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 1 हजार 400 पुरुष व महिला पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी देण्यात आल्या आहेत. हा बंदोबस्त आज सोमवार दि. 24 जून पासूनच शहरात विविध ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. बुधवारी पालखी सोहळा शहराच्या हद्दीमधून बाहेर पडेपर्यंत हा बंदोबस्त कायम राहणार आहे.

आज शहरात येणार तुकोबारायांची पालखी आज दि. 25 जून रोजी संत तुकाराम महाराज यांची पालखी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होईल. आकुर्डी येथे पालखीचा मुक्काम असून, बुधवारी (26 जून) सकाळी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. त्याचबरोबर आळंदीवरून पुण्याकडे मार्गस्थ होणाऱ्या संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीसाठी आळंदी, दिघी, विश्रांतवाडी या मार्गावर पोलिसांचा अतिरिक्‍त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.