सोशल मीडियावर वाढला “वॉच’

पोलीस सतर्क : गरज पडल्यास गुन्हेही दाखल करणार

– संदीप घिसे

पिंपरी – एरव्ही सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच हा असतोच. मात्र गेल्या निवडणुकीत तसेच आगामी अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सोशल मीडियावरील वॉच वाढविला आहे. तसेच वेळ पडल्यास भडकावू पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलीस गुन्हे दाखल करणार आहे.

दोनच दिवसांपूर्वी चिंचवडमधील एका तरुणाच्या मृतदेहास सोशल मीडियामुळे वारस मिळाल्याची घटना घडली. तर वर्षभरापूर्वी सोशल मीडियावरून पत्नीने बदनामी केल्याने पतीने आत्महत्या केल्याची घटनाही याच शहरात घडली आहे. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. याचा जेवढा चांगला वापर आहे तेवढाच गैरवापर करणारेही आहेत. मात्र सोशल मीडियामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्‍यात येऊ नये म्हणून पोलीस यंत्रणाही सर्तक झाली आहे. निवडणूक काळात पोलिसांनी अशा प्रकारे भावना दुखावणाऱ्या पोस्टवर “वॉच’ ठेवला होता.

रोज आक्षेपार्ह पाच ते सहा पोस्ट
अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल लवकरच सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे. हा निकाल देणारी संस्था देशातील सर्वोच्च न्याय व्यवस्था आहे. हा निकाल स्वीकारणे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. या निकालापूर्वी आणि निकालानंतर सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होण्याची शक्‍यता गृहित धरून पोलिसांनी याबाबत उपाययोजना सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयातील सायबर विभागाचे कर्मचारी सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या पोस्टवर दिवस रात्र नजर ठेवून आहेत. सध्या आक्षेपार्ह असणाऱ्या पाच ते सहा पोस्ट दिवसाला आढळून येत आहेत. या पोस्ट पोलीस आयुक्‍तांच्या आदेशानुसार डिलीट करण्यात येत आहेत.

सध्या पोलिसांनी फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब, व्हॉटस्‌ऍप आदी सोशल मीडियावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. आगामी काळात सोशल मीडियावरून अयोध्याबाबत प्रसारित होणाऱ्या पोस्टवर पोलिसांनी नजर असणार आहे. अयोध्या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणारा निकाल याबाबतची प्रत्येक पोस्टवर पोलिसांची नजर असणार आहे. कारण न्यायालयाच्या निकालाबाबत भाष्य करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान असणार आहे. समाजात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे जुने व्हिडिओ, फोटो प्रसारित करून अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

यामुळे अशा आक्षेपार्ह पोस्ट पोलीस डिलीट करणार आहेतच. मात्र अशा प्रकारची पोस्ट व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तयारीही पोलिसांनी केली आहे. मात्र अशा प्रकारची कारवाई करताना पोलीस आयुक्‍तांची कार्यकक्षा लक्षात घेतली जाणार नाही. आक्षेपार्ह पोस्ट देशाच्या कोणत्याही भागातून टाकलेली असली तरी पोलीस त्यावर कारवाई करू शकणार आहेत.

निवडणूक काळात 150 पोस्ट केल्या डिलीट
निवडणुकीच्या काळातही सायबर विभागाचे सोशल मीडियावर चांगलाच “वॉच’ होता. निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबाबत सोशल मीडियावरून विविध पोस्ट आल्या. मात्र त्यापैकी बदनामीकारक असलेल्या 150 पोस्ट सायबर विभागाला आढळून आल्या. पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांच्या आदेशानुसार या पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहेत.

“इतरांची बदनामी करणे, धार्मिक भावना दुखावणे, अश्‍लील फोटो किंवा पोस्ट व्हायरल करणे आदींकडे पोलिसांची बारीक नजर आहे. अशा प्रकारची कृत्य करणाऱ्यांवर यापुढील काळात गुन्हे देखील दाखल करण्यात येणार आहेत.”
– सुधाकर काटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक-सायबर विभाग

Leave A Reply

Your email address will not be published.