आंबेगाव तालुक्यातील वैद्यकीय विभागाचे लक्ष
मंचर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यात गेल्या आठवडाभरात परदेशातून 17 नागरिक आले असून, त्यांना करोना व्हायरसची कोणतीही लक्षणे नसल्याचा दावा आंबेगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी केला आहे, तसेच नागरिकांनी विनाकारण बाहेर गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
परदेशात फिरण्यासाठी गेलेले तालुक्यातील विविध गावांतील 17 नागरिक नुकतेच परतले आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी पुणे येथे करण्यात आली असून त्यांना करोनाचा प्रादुर्भाव नाही; परंतु खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्यावर वैद्यकीय विभागाचे लक्ष आहे, तसेच करोना संशयित म्हणून काही रुग्ण गावाकडे आले असल्यास त्यांच्या हातावर शिक्के मारले आहेत.
ते जर गावात फिरत असतील तर आणि ऐकत नसेल तर त्या व्यक्तीच्या विरोधात पंचायत समिती आरोग्य विभाग आणि पोलिसांनाही माहिती द्यावी. म्हणजे संबधित संशयित रुग्णांना अटकाव करणे शक्य होईल, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले.
गावामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, किंवा राज्याबाहेरील एखाद्या मोठ्या शहरामधून कामानिमित्त असलेले ग्रामस्थ परत गावात आले असतील, अशा नागरिकांबाबतची माहिती ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस पाटील, आरोग्य विभाग यांना द्यावी. बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी आपली आरोग्य केंद्राकडून तपासणी करून घ्यावी.
आपल्याला काहीही त्रास नसला तरी सार्वजनिक आरोग्यासाठी किमान 14 दिवस घरामध्येच आराम करण्याच्या सूचना तालुकास्तरीय आपत्कालीन कक्षाकडून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी याबाबत दक्षता पाळावयाची असून यामध्ये काही गैर आढळल्यास प्रशासनाच्या निर्दशनास आणून द्यावे, असे आवाहन तहसीलदार रमा जोशी यांनी केले आहे.