पुणे – महापालिकेकडून गेल्या 15 वर्षांत उभारलेल्या कचरा प्रकल्पांचे तातडीने ऑडीट करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे यांनी दिले. महापालिकेकडून कचरा प्रकल्प उभारुनही शहरातील कचरा समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हे ऑडीट करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरात दररोज सुमारे 1800 ते 2 हजार टन कचरा निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने 2005 पासून कचरा प्रक्रिया प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प तसेच प्रभागांच्या स्तरावर 5 ते 10 टन क्षमतेचे प्रकल्प उभारले आहेत.
मात्र, यातील अनेक प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाहीत, तर अनेक बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे महापालिका एका बाजूला कचरा प्रक्रियेसाठी कोट्यवधींचा खर्च करत असली तरी दुसऱ्या बाजूला शहरात दिवसेंदिवस कचरा समस्या गंभीर झाली आहे.
त्यामुळे हे प्रकल्प कधी उभारले, त्याची क्षमता किती, ते प्रत्यक्षात किती क्षमतेने सुरू आहेत. त्यावर किती खर्च केला जातो, त्याची आवश्यकता आहे का अशाप्रकारे या प्रकल्पांचे ऑडीट करण्यात येणार असल्याचे रासने यांनी स्पष्ट केले.