मुंबई – उत्तराखंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणाऱ्या वासिम जाफरच्या वादाप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दिले आहेत. मुस्लीम क्रिकेटपटूला निवडीसाठी प्राधान्य देणे तसेच जैवसुरक्षित वातावरणात असतानाही संघाच्या ड्रेसिंगरूममध्ये मौलवींना नमाजसाठी निमंत्रण देणे असे आरोप जाफरवर करण्यात आले होते.
अर्थात, जाफरने हे सर्वआरोप फोटाळून लावले असून भारताच्या अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनीही जाफरला पाठिंबा दिलाआहे. हा वाद दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे अखेर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हे आदेश देण्यात आले.
या शिष्टमंडळामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष संजय रावत, खजिनदार पृथ्वी सिंह नेगी, सहसचिव अवनिश वर्मा आणि कार्यकारिणी सदस्य रोहित चौहान यांचा समावेश होता. निवडीमध्ये सचिव महिम वर्मा यांचा हस्तक्षेप असल्यामुळे जाफरने 8 फेब्रुवारीला प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.
या प्रकरणाला धार्मिक वळण लागल्यानंतर भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे, इरफान पठाण व महंमद कैफ या माजी क्रिकेटपटूंनी जाफरला पाठिंबा दिला होता.