मुंबई – तंत्रशुद्ध सलामीवीर अशी ओळख असलेल्या वासिम जाफरने अखेर क्रिकेटचा निरोप घेण्याची घोषणा केली आहे. विदर्भ क्रिकेटच्या ऐतिहासिक विजयामध्ये वासिमचा मोलाचा वाटा होता. रणजी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम वासिमच्या नावावर आहे.
Most runs in Ranji Trophy ✅
Most capped player in Ranji Trophy ✅We wish Wasim Jaffer well as he announces his retirement from all formats of the game.
LINK ? https://t.co/Ch1NIpKdzc pic.twitter.com/6LVOx1vGn8
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 7, 2020
मुंबईकडून रणजी करंडक खेळताना वासिमने निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. त्यानंतर भारतीय संघातही त्याची निवड करण्यात आली होती. भारताकडून वासिमने 31 कसोटी सामन्यांमध्ये 1944 धावा केल्या होत्या. यामध्ये पाच शतकांसह 11 अर्धशतकांचा समावेश होता. वेस्ट इंडिजविरुद्ध वासिमने 212 धावांची सर्वोत्तम खेळी साकारली होती. भारताकडून दोन एकदिवसीय सामनेही वासिम खेळला होता.
स्थानिक क्रिकेटमध्ये वासिम हा फलंदाजीचा कणा मानला जायचा. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील 12 हजार धावांचा विक्रम वसिमच्याच नावावर आहे. त्याचबरोबर 260 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये वासिमने 50.67 च्या सरासरीने 19,110 धावा केल्या आहेत. वसिमच्या नावावर 57 शतके व 91 अर्धशतके आहेत. प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये 314 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
आतापर्यंत मी जे काही क्रिकेटमध्ये कमावले त्यामध्ये माझ्या कुटुंबीयांचा महत्त्वाचा वाटा आहे. आई-बाबांबरोबर माझ्या भावांनी मला क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो, असे जाफर म्हणाला.