ज्याची भिती होती तेच झालं ! मंत्री संजय राठोडांच्या शक्ति प्रदर्शनानंतर पोहरादेवीत करोनाचा धुमाकूळ

वाशिम : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर अज्ञातवासात गेलेले वनमंत्री संजय राठोड 23 तारखेला पोहरादेवी येथे दाखल झाले. वाशिम जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी महंतांना नोटीस बजावली होती. तसेच मुख्यमंत्र्यांनीही गर्दी टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरीही राठोड यांचे हजारों समर्थक पोहरादेवी येथे आल्याने जी भिती होती तेच झालं आहे.

मंत्री संजय राठोड यांच्या दौऱ्यानंतर येथे करोना रूग्णसंख्येत वाढ होत आहे. 22 तारखेला 30 नागरिकांच्या करोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. यामध्ये येथील महंत कबिरदास महाराज यांच्या कुटुंबातील चार जणांसह आज 8 जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. राठोड यांनी कबिरदास महाराजांचे दर्शन घेतले होते. त्यामुळे राठोड यांनाही करोना टेस्ट करावी लागणार आहे.

पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांचा करोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला असून गावात करोना चाचणी सुरू आसल्याची माहिती येथील आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात करोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता आहे, करोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र त्यांच्या सरकारमधीलच मंत्र्यांनी त्यांच्या आवाहनाला डावलून मोठ्या प्रणामात गर्दी जमवली. आणि आता तेथे करोनाचे रुग्ण वाढत असल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राठोड यांच्यावर कारवाई करणार का, हे पाहणे महत्वाचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.