Ajit Pawar : महाराष्ट्रासाठी आजच दिवस मोठा दुःखद ठरला आहे. राजकारणातील मुरब्बी नेत्याने अकाली एक्सिट घेतली आहे. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले आहे. बारामतीमध्ये जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी येत असताना आज सकाळी पाऊणेनऊ वाजण्याच्या सुमारास अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला. विमान लँडिंग करत असताना विमानाचा भीषण स्फोट झाला. या अपघातात अजित पवारांसह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर विमान कंपनीवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. विमानात तांत्रिक बिघाड होऊन अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली असून, या प्रकरणी आता कंपनीच्या मालकांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘व्हीएसआर एव्हिएशन’ (VSR Aviation) चे मालक व्ही. के. सिंह यांनी आपली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. विमानामध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा संशय त्यांनी फेटाळून लावला आहे. यामुळे विमानात स्फोट नेमका कशामुळे झाला हा प्रश्न विचारला जात आहे. ब्लॅक बॅाक्समधून अपघाताची संपूर्ण माहिती उलगडली जाणार असून याकडे लक्ष असणार आहे. नेमंक काय म्हणाले व्ही. के. सिंह ? “आमच्या माहितीनुसार आणि रेकॉर्डनुसार, हे विमान तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त (Fit) होते. उड्डाणापूर्वी सर्व आवश्यक सुरक्षा चाचण्या पूर्ण करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा, असे प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही.” अशी पहिली प्रतिक्रिया व्ही के सिंह यांनी दिली आहे. या घटनेची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. प्राथमिक अंदाजानुसार लँडिंगच्या वेळी त्या परिसरात दृश्यमानता अत्यंत कमी होती. यामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाच आला नसावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय होते, हे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असे सिंह यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने या भीषण अपघाताची दखल घेतली असून, DGCA कडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ आणि तांत्रिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. यानंतर विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास झाल्यानंतर माहिती समोर येईल, असे सांगण्यात आले आहे. हेही वाचा : Shambhavi Pathak : 25 व्या वर्षी आलं वेदनादायी मरण; कोण होती शांभवी पाठक?