नवी दिल्ली – अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम वेगाने पूर्ण होत असून या मंदिरासाठी वापरण्यात येणारे साहित्य सध्या चर्चेत आले आहे. राम मंदिराचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. जानेवारी 2024 च्या तिसर्या आठवड्यात त्यामध्ये रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल आणि त्या दिवसापासून भाविकांना दर्शन आणि पूजा करण्याची व्यवस्था केली जाईल. महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या जंगलातील सागवान लाकूड राम मंदिराच्या उभारणीसाठी वापरण्यात येणार आहे.
राम मंदिराच्या उभारणीसाठी चंद्रपूरच्या जंगलातून सुमारे १८५५ घनफूट सागवान लाकूड आणण्यात आले आहे. मंदिराच्या उभारणीसाठी हेच लाकूड का निवडले गेले असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. यासाठी 1.32 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. लवकरच हे लाकूड अयोध्येत पोहोचवले जाईल. या मुलीचा वापर रामललाच्या मंदिरात केला जाणार आहे.
या लाकडं बाबत सांगताना महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक जी.ए.मोटकर म्हणाले की, ‘डेहराडून वन संशोधन संस्थेने चंद्रपूर आणि गडचिरोली येथे उत्तम दर्जाचे लाकूड मिळू शकेल अशी शिफारस राम मंदिर ट्रस्टला केली. हे लाकूड अतिशय दर्जेदार आहे. म्हणूनच मंदिराच्या बांधकासाठी हे लाकूड निवडले गेले. सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकामातही या लाकडांचा वापर करण्यात आला आहे.’
दरम्यान, अयोध्येत श्री रामजन्मभूमी मंदिराच्या आसपासच्या भागात कॉमन बिल्डिंग कोड लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अंतर्गत राम मंदिराच्या आजूबाजूच्या सर्व इमारती एकाच आकारात आणि रंगात बांधल्या जातील.