तो खरंच न्याय होता का…? (बोला बिनधास्त)

‘निर्भया’ हा शब्द कानावर पडताच मन सुन्न करणारी दिल्ली मधील ती काळी रात्र आठवते. तो दिवस, आता लागलेला निकाल आणि झालेली फाशी या तीनही घटनाक्रमामध्ये जो मोठा फरक दिसून येतो तो फरकच त्या मिळालेल्या न्यायाचा प्रभाव कमी करुन जातो असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

‘ती काळी रात्र’ (१६ डिसेंबर २०१२) ते ‘ती आधार देणारी सकाळ’ (२० मार्च २०२०) या दरम्यान तब्बल २६५१ दिवस ओलांडून गेले. खरं तर हे दिवस मुळात न्याय देण्यास महत्वाचे ठरले असतीलही पण ‘तो खरंच न्याय होता का…?’ हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहून गेला. संपूर्ण प्रकरणामध्ये एवढा विलंब का झाला हा यक्ष प्रश्न आहे . या घटना घडत असतांना एकीकडे आपण महिला सशक्तीकरणावर जोर देतांना दिसतो, दुसरीकडे मात्र न्याय व्यवस्थेतील उणिवा संपूर्ण प्रकरणाला निकाली येण्यापासून विलंबित करतात. समाजाचा विकास किती झाला या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात “एखादा समाज किती प्रगत झाला हे समाजातील स्त्री च्या प्रगती वरून दिसून येते ” आपण खरंच स्त्री ला तेवढं प्राधान्य देतोय का ..? आजही राजकीय दबावामुळे कित्येक बलात्काराची प्रकरणे दाबली जातात, एकटी जात असलेली स्त्री ही एक संधी म्हणून बघितली जाते, आणि काही ठिकाणी तर असं काही घडलं तर त्याचा दोष मात्र तिच्या राहणीमानाला देण्यात येतो.

ज्या दिवशी महिलेला तेवढं प्राधान्य दिलं जाईल तेवढा आत्मसन्मान तिला मिळेल तेव्हाच ती खरी ‘सशक्त’ होईल. ‘चार नराधमांना झालेली फाशी’ हा संपूर्ण प्रकरणांची फाईल बंद करण्यासाठी शेवटचा टप्पा असेल. पण आपल्या समाजातील प्रत्येक निर्भया निडरपणे ज्या दिवशी आयुष्य जगू शकेल तोच खरा न्याय असेल .

‘निर्भया’ तूच खरी त्या दिव्याची ‘ ज्योत ‘
तुजविण नाही त्या दिव्याला अर्थप्राप्ती
तूच त्या दिव्याचा प्रकाश,
तूच दूर करशील अंधार
तूच जेव्हा होशील भयमुक्त
तोच दिवस असेल ‘न्याय दिवस’….
तोच दिवस असेल ‘न्याय दिवस’….
– भूषण आसरे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.