करत होता आत्महत्या; पोलिसांनी वाचवले प्राण

मार्केटयार्ड येथील घटना

पुणे – लॉकडाऊनमध्ये अनेक महिने घरात कोंडून राहिल्याने तसेच नोकरी, व्यवसायात नुकसान झाल्याने अनेकांना नैराश्‍याने ग्रासले असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे. यातूनच वैयक्‍तिक किंवा आर्थिक कारणातून शहरात आत्महत्या होत आहेत. शहरात आत्महत्येचे सत्र सुरू असताना पोलिसांच्या तत्परतेमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचे प्राण वाचले.

लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी झाल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे एका तरुण मित्राला सांगितले. मित्राने याची माहिती तातडीने पोलिसांना कळवली. मार्केटयार्ड पोलिसांनी तत्काळ धाव घेत संबंधित तरुणाचे समुपदेशन करीत त्याला नैराश्‍येतून बाहेरही काढले.

मार्केटयार्ड येथील हाईडपार्क येथे राहणारा मित्र आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला रविवारी साडेदहाच्या सुमारास आला. त्यानंतर मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलनी त्या ठिकाणी धाव घेत तो राहत असलेली सदनिका शोधली. दरवाजा वाजविला असता सुरवातीला तो दरवाजा उघडत नव्हता. त्याला विनवणी व समजावून सांगत दरवाजा उघडण्यास भाग पाडले, त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तो नैराश्‍येत असल्याचे तसेच आत्महत्या करणार असल्याचे समजले.

मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात त्या तरूणाला घेऊन आल्यानंतर चौकशी असता, त्याचा जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. करोनामुळे व्यवसाय बंद पडला. काही व्यवहार अडकल्याने कर्ज वाढले होते. पैसे देणे असल्यामुळे संबंधितांचे दररोज फोन येत होते. आत्महत्या केल्यानंतर ही कटकट राहणार नाही, या विचारात असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या भावासोबत बसवून त्याचे समुपदेशन करीत तरुणास या विचारातून बाहेर काढले.

Leave A Reply

Your email address will not be published.