Sharad Pawar :अजित पवार यांच्या निधानानंतर उपमुख्यमंत्री पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विराजमान होणार आहेत. आज सायंकाळी मुंबईत पाच वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे. अशातच आज सकाळी देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार (Sharad Pawar)यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत कल्पना नसल्याचे विधान केले. त्यानंतर त्यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी पहिल्यांदाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात भाष्य केले आहे. “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या ही चर्चा चार महिने सुरू होती. याचं नेतृत्व अजित दादा आणि जयंत पाटील यांच्यावर होते. अपघात झाला आणि यात खंड पडला,” असा मोठा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रीकरणाच्या तारीख देखील ठरली होती, असे देखील शरद पवार म्हणाले आहेत. Sharad Pawar and Sunetra Pawar हेही वाचा : Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांंच्या शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर भाष्य म्हणाले.. एकत्रीकरणावर काय म्हणाले शरद पवार? आमच्या पक्षात आणि त्यांच्या पक्षात एकत्र काम करण्याचं एकमत होतं. हा निर्णय 12 तारखेला जाहीर करायचा होता. ही तारीख अजितदादांनीच दिली होती. दोन्ही पक्षात सकारात्मक चर्चा होती पण अचानक ही घटना झाली. अजित पवार सत्तेतून बाहेर पडणार होते? दोन्ही पक्ष एकत्र येण्यावरुन शरद पवारांना प्रश्न विचारताना भाजपासोबतच राहण्याचा विचार होता का अशी विचारणा करण्यात आली. त्यावर शरद पवारांनी, “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. पण भाजपासोबत नाही,” असे वक्तव्य केले आहे. यानंतर आता अजित पवार हे दोन्ही राष्ट्रवादी विलीन झाल्यास सत्तेतून बाहेर पडणार होते असेच शरद पवारांनी त्यांच्या विधानातून सूचित केल्याची चर्चा रंगली आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून, या व्हिडीओत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकत्रीकरणासंदर्भात एक गुप्त बैठक पार पडली होती, असे सांगितले जात आहे. या बैठकीला दोन्ही बाजूंचे महत्वाचे नेते उपस्थित होते. शरद पवार आणि अजित पवार देखील होते. दुसरीकडे सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झाल्यानंतर बारामती मोठ्या हालचाली होत असून, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडल्याची माहिती समजते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कोणत्या राजकीय घडामोडी घडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. शरद पवारांकडून अजित पवारांवर कौतुकाचे उद्गार अजित पवार हे कर्तृत्ववान नेते होते. संघटनेत काम करताना त्यांनी नेहमीच सामान्य जनतेशी थेट संवाद साधला. लोकांचे प्रश्न समजून घेणे, त्यावर माहिती घेणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, हेच अजित पवारांचे वैशिष्ट्य होते. अशा शब्दांत शरद पवार यांनी अजित पवार यांच्या विषयी भावना व्यक्त केल्या. प्रत्येक व्यक्तीचे समाजासाठी काही ना काही योगदान असते. अजित अनेक वर्षे संघटनेत सक्रिय राहून लोकांच्या प्रश्नांसाठी झटत राहिले. त्यांची कामाची सुरुवात पहाटेच होत असे. कामात कधीही त्यांनी कमतरता दाखवली नाही, असे देखील शरद पवार म्हणाले. हेही वाचा : India- US Trade Agreement : अमेरिकेने भारताला दिली मोठी ऑफर; व्यापार कराराचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता