कराड तालुक्‍यातील वॉरियर्स…

पराग शेणोलकर

कराड  -जगभरात करोनाने थैमान घातले असताना कराड तालुक्‍यात करोनाला रोखण्यात येथील प्रशासनाला यश आले आहे. प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या नेतृत्वाखाली महसूल, आरोग्य, नगरपालिका, ग्रामपंचायत विभाग आवश्‍यकतेनुसार कृषी, पाटबंधारे, शिक्षण, सरकारी व शैक्षणिक संस्था आदींच्या मदतीला उपविभागीय पोलीस उपाधिक्षक सुरज गुरव यांनी पोलीस प्रशासन ठामपणे उभे केले. आपआपसामधील समन्वय व जिद्दीच्या जोरावर करोनाशी यशस्वी मुकाबला केला आहे. तालुक्‍यातील अनेक गावे व शहरातील करोनासाखळी खंडित करण्यात यश आले आहे.

करोना लढ्याची सुरूवात मार्च महिन्यातील संचारबंदीने झाली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संचारबंदी आदेश लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आली. त्यांच्या मदतीला महसूल, नगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासन मदतीला पुढे आले. बॅरिकेटींगसह महत्चाच्या ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले. सर्व विभागांच्या समन्वयातून संचारबंदीची कडक अंमलबजावणी तालुक्‍यात करण्यात आली. हॉटेल, मंगल कार्यालय, जिम, देवस्थाने बंद करण्यात आली. गावोगावच्या यात्रा महसूल, पोलीस, ग्रामपंचायत यांनी एकत्रित बैठक घेऊन रद्द करण्यात आल्या. गाव पातळीवर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समिती नेमली गेली.

लॉकडाऊन च्या काळात स्थलांतरित मजुरांचा मद्दा ऐरणीवर आला. यावेळी स्थलांतरित मजुरांसाठी तालुक्‍यातील विराज मल्टीपर्पज हॉल (वाठार), आकाश मल्टीपर्पज हॉल (उंब्रज) या दोन ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांच्यासाठी दररोज चहा, जेवण, नाश्‍ता याची व्यवस्था तलाठी व मंडल अधिकारी यांनी केली. तर मजुरांची दैनंदिन आरोग्य तपासणीसह पोलिसांनी संरक्षण देण्यात आले. हे निवासगृह दि. 25 मार्च ते दि. 10 मे पर्यंत चालू होती.

उपासमारीवर पर्याय म्हणून संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात पुरवठा विभागाने कराड-मलकापूर परिसरात नगरपालिका हद्दीत 13 ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. यामध्ये सुमारे 725 थाळीचे वाटप करण्यात आहे. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाची उपासमार होऊ नये, यासाठी महसूल, पोलीस, नगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासनाने धान्याचे कीट वाटप केले. अनेक स्वयंसेवी संस्था तसेच व्यक्‍तींनाही आवाहन केले. या सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत तालुक्‍यात 23 हजार पेक्षा जास्त कुटुंबांना धान्यवाटप केले. त्याचबरोबर मार्च-एप्रिल-मे व जून महिन्याचे धान्य रेशनकार्ड धारकांना वाटप करण्याचे नियोजन तसेच शासनाने जाहीर केलेला मोफत तांदूळ प्रत्येक कार्डधारकांना वाटप केले आहे.

मुंबई-पुणेसह बाहेरहून आलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरी सोय असल्यास घरीच होम क्‍वारंटइन तर ज्यांची घरी सोय नाही त्यांना गावातील शाळा, समाजमंदिरे याठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे काम ग्रामस्तरीय समिती करत आहे. तसेच दररोजची आरोग्य तपासणी आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका करत आहेत. गावात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती पोलीस पाटील व ग्रामपंचायत यांनी संकलित करून तालुक्‍यात प्रत्येक गावात किती लोक बाहेरून आले याची माहिती संकलित केली आहे.

तालुक्‍यात एखादा करोनाबाधित व्यक्ती सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील हायरिस्क व लो रिस्क व्यक्तींचा शोध घेणे त्यांना तात्काळ संस्थात्मक विलिनीकरण कक्षात म्हणजे, पार्ले येथील दोन वसतिगृह, सैदापूर इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेजची पाच वसतिगृह, कृषी महाविद्यालय, विजयनगर येथील एक वसतिगृह, वाठार येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे एक वसतिगृह दाखल केले जात आहे. सहाशे व्यक्तींची क्षमता असलेले हे कक्ष कित्येकवेळा हाऊसफुल झाल्याचे दिसले.

3 हजार 392 परप्रांतीयांची सुखरूप रवानगी
शासनाने परराज्य व परजिल्ह्यातील मजुरांना गावी पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे कराड तालुक्‍यातून परराज्य व परजिल्ह्यातील मजुरांची माहिती तलाठी, ग्रामपंचायत व नगरपालिका यांच्यामार्फत एकत्रित केली गेली. त्यांनी ऑनलाईन केलेल्या रजिस्टरवरून टोकन नंबर घेणे सर्वांची राज्यनिहाय वेगवेगळी यादी तयार करणे सर्व मजुरांना एकत्रित करून एसटी महामंडळाचे बसद्वारे सातारा रेल्वे स्टेशन वर पोहोच करणे, एसटीमध्ये प्रत्येक सीटवर एक व्यक्ती याप्रमाणे नियोजन करून प्रत्येक मजुरास फूड पॅकेट व पाण्याची बॉटल्या देण्याचे काम प्रशासनाने चोख बजावले. आतापर्यंत मध्यप्रदेशमध्ये 166, राजस्थानमध्ये 625, उत्तरप्रदेश मध्ये 1500, झारखंडमध्ये 94, पश्‍चिम बंगालमध्ये 210, कर्नाटकमध्ये 522, तमिळनाडूमध्ये 409 अशी एकूण 3 हजार 392 मजुरांना पाठवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.