आमदार राहुल कुल यांच्यावर वॉरंट

दौंड न्यायालयाकडून स्टेट बॅंकेच्या कर्जप्रकरणी आदेश

वरवंड – दौंड तालुक्‍यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि विद्यमान आमदार राहुल कुल यांच्यासह एकूण तीन जणांना दौंड न्यायालयाने स्टेट बॅंकेच्या कर्ज परतफेडपोटी दिलेला पाच कोटी रूपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने वॉरंट बजावले आहे.

दौंड तालुक्‍यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने दौंड शहरातील स्टेट बॅंकेचे 2015-2016 या गळीत हंगामाकरिता कर्ज घेतले होते.

कारखान्याच्या 400 ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदारांना प्रत्येकी 5 लाख रूपये याप्रमाणे 20 कोटी रूपयांचे कर्ज कारखान्याच्या संचालकांच्या विनंती आणि दिलेल्या हमी वरून मंजूर करून देण्यात आले होते. कारखान्याच्या ठरावानुसार ऊस तोडणी व वाहतूकदार यांच्या नावावर घेतलेल्या या कर्जाची व्याजासह परतफेड करण्याची जबाबदारी कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व संचालकांनी वैयक्तीक व संयुक्तरित्या स्वीकारली होती. बॅंकेने वेळोवेळी मागणी करूनही सदर कर्जाची व्याजासह परतफेड करण्यात आली नव्हती. यानुसार बॅंकेने सदर कारवाई केली आहे.

आमदार राहुल कुल म्हणतात..
दौंड येथील न्यायालयामध्ये भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संबंधित स्टेट बॅंक ऑफ इंडिया मधील धनादेश न वटल्याबाबत खटला दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणांमध्ये संबंधित बॅंकेने अटी नियमांप्रमाणे तसेच बॅंकेसोबत करण्यात आलेल्या करारातील तरतुदींचे पालन न करता चुकीच्या पद्धतीने सदरचा खटला दाखल केला आहे, असे संचालक मंडळाचे मत झाल्याने आम्ही न्यायालयामध्ये जाऊन न्याय मागण्याची भूमिका घेतलेली आहे.

जर न्यायालयामध्ये संघर्ष करून शेतकरी सभासदांचा तसेच कारखान्याचा फायदा होणार असेल तर आम्ही न्यायालयमध्ये जाण्यास तयार राहण्याची भूमिका ठेवली आहे. वकिलांशी चर्चा विनिमय केल्यानंतर वरिष्ठ न्यायालयामध्ये या खटल्याच्या बाबत दाद मागता येऊ शकते तसेच योग्य पद्धतीने मार्ग काढता येऊ शकतो, अशी खात्री आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. जर आम्ही तडजोडीची भूमिका ठेवली असते तर कारखान्याचा तोटा झाला असता याउलट संचालक मंडळास होणारा त्रास व संस्थेचा फायदा लक्षात घेऊन आम्ही न्यायालयात जाऊन न्याय मागण्याची भूमिका ठेवली आहे. विविध संस्था कारखाने अनेक वेळा न्यायालयात संघर्षाची भूमिका घेत असतात यात वावगे काही आहे, असे मला वाटत नसल्याचे मत भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.