सोलापूर : न्यायालयाने दिलेल्या तारखेला न्यायालयात हजर न राहिल्याने सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 2 जानेवारी 2018 रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यायात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीदरम्यान झालेल्या गोंधळा प्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यासंबंधी न्यायालयाने वेळोवेळी तारीख देवूनही त्या न्यायालयात हजर राहिल्या नाहीत त्यामुळे त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. तर कॉंग्रेसकडून प्रणिती शिंदे यांच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे यांच्यासह माजी आमदार प्रकाश यलगुलवार,कॉंग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले आणि अन्य सहा जणांनी न्यायालयाने दिलेल्या तारखेला न्यायालयात हजेरी लावली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांना 30 ऑगस्टपर्यंत अंतरिम जामिन मंजूर करण्यात आला आहे.