कास धरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा

विश्वासात न घेता जमिनी संपादित केल्याचा आरोप

सातारा शहराची जलवाहिनी असलेल्या कास तलावाची उंची वाढवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. कास तलावाची उंची वाढविल्याने सातारा शहराला मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. परंतु, या कामाच्या दरम्यान कास गावातील ग्रामस्थांच्या जमिनी पाण्याखाली येणार असल्याने कास गावातील अनेक खातेदार बाधित होत आहेत. संबंधित विभागाने गावातील बाधित खातेदारांना विश्वासात न घेता जमिनी संपादित केल्याचा आरोप कास धरण कृती समिती, ग्रामस्थांकडून केला जात असुन आपल्या विविध मागण्याचे निवेदन कास ग्रामस्थांनी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर यांना दिले आहे. संबंधित मागण्यांबाबत 28 फेब्रुवारी पर्यंत सकारात्मक चर्चा होवून तोडगा न निघाल्यास धरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

कास धरणाची उंची वाढवल्याने कास गावातील ग्रामस्थांच्या लाभ क्षेत्रातील जमिनी पाण्याखाली येत आहेत. त्यामुळे कास ग्रामस्थांकडून धरणामध्ये बाधित होणाऱ्या खातेदारांना पुनर्वसनाचा कायदा लागू करून गावठाण आणि पर्यायी जमीनी देण्यात यावी, नवीन कायद्यानुसार संपादित जमिनीची नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागणीसह धरणाच्या कामात बाधित होणाऱ्या गावातील अंतर्गत रस्त्यांना पर्यायी नवीन रस्तांची निर्मिती करावी, अठरा नागरी सुविधांचे गावठाण निर्माण करुन मिळावे, कासारदेवीचे मंदिर धरणाच्या बुडीत क्षेत्रात बाधित होत असल्याने त्यांचे मुल्यमापन करून नवीन मंदिर बांधण्यासाठी नुकसान भरपाई मिळावी. यांसह इतर मागण्या कास ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहेत.

कास ग्रामस्थांनी त्यांच्या मागण्या संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदनाद्वारे कळविल्या आहेत. परंतु, कास धरणाचे उंची वाढवण्याचे काम पूर्णत्वास येऊन ठेपले असताना देखील कास ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होत नसल्याने फेब्रुवारी पर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा होवून तोडगा न निघाल्यास धरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा कास ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी कास धरण कृती समितीचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.