पुणे-हवामान विभागातर्फे पुण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच भागांमध्ये येत्या 24 तासांत थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी किमान तापमानात लक्षणीय घट होणार असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 25) शहरात हंगामातील नीचांकी 8.5 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद घेण्यात आली आहे.
शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून गार वारे वाहत असून, थंडीचा कडाका वाढला आहे. कमाल आणि किमान तापमानातही सातत्याने घसरण होत आहे. येत्या 24 तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांत थंडीची लाट येणार असल्याने तापमानात आणखी घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मंगळवारी नाशिक जिल्ह्यात 6.3 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. पुण्यात कमाल तापमान 26.3 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 8.5 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
उत्तर प्रदेशाच्या उत्तर पश्चिम भागावर पश्चिमी चक्रीय स्थिती कार्यरत आहे, तर 29 जानेवारीला हिमालयाच्या भागात आणखी एक नवीन पश्चिमी चक्रावात धडकणार आहे. या स्थितीच्या तीव्र प्रभावामुळे जम्मु-काश्मीर, लडाख, हिमालयीन प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यामध्ये दाट धुक्यासह अतीतीव्र थंडीची लाट येणार आहे. महाराष्ट्रामध्येही त्याचा प्रभाव जाणवणार आहे.
– डॉ. अनुपम काश्यपि, हवामानशास्रज्ञ
काय काळजी घ्याल?
*उबदार कपडे परिधान करावे.
*थंड वाऱ्यांचा संपर्क टाळण्यासाठी शक्य तो घराबाहेर पडू नये.
*कोमट पाणी प्यावे.
*आजूबाजूचा परिसर कोरडा ठेवावा.