आयुक्त हर्डीकर : चुकीच्या माहितीमुळे करोनाबाधित शोधण्यात अडचणी
पिंपरी – काही नागरिक करोना संबंधित चाचण्या करण्यासाठी गेल्यावर त्याठिकाणी चुकीचा पत्ता, नाव व मोबाइल नंबर देत आहेत. त्यामुळे महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि करोनाचा प्रसार रोखण्यामध्ये बाधा निर्माण होत आहे. अशी दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या व्यक्तींवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नियमाधीन कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त हर्डीकर यांनी दिला.
वाढत्या करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि यंत्रणेची नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आज पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आयुक्त हर्डीकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने केलेल्या आणि भविष्यात करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी आयुक्त हर्डीकर बोलत होते.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे, उपायुक्त अजय चारठणकर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच महापालिका रूग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
करोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींच्या महापालिका रूग्णालये अथवा खासगी रूग्णालयांमार्फत चाचण्या करण्यात येत आहेत. शिवाय करोनाबाधित रूग्ण आढळल्यास या रूग्णाच्या संपर्कात येणाऱ्या इतर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर वैद्यकीय उपचार, तपासण्या, चाचण्या अथवा मार्गदर्शनपर सूचना करण्याचा महापालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे.
मात्र काही नागरिक करोना संबंधित चाचण्या करण्यासाठी गेल्यावर त्याठिकाणी खोटा अथवा चुकीचा पत्ता देत असल्याने उपाययोजना राबविण्यात बाधा निर्माण होत आहेत. असे चुकीचे पत्ते व दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या व्यक्तींवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे.