अंजली खमितकर
पुणे – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा यावर्षी पुणे शहरात मुक्काम आणि मुळातच पायी वारी नसल्याने शहरात धान्य आणि आवश्यक गोष्टींची होणारी उलाढाल यंदा होणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
आळंदी, देहूवरून पालख्या पुण्यात मुक्कामी आल्या की, शहरात दोन दिवस वातावरण अगदी भक्तिमय होऊन जाते. ठिकठिकाणी दिंड्यांचा मुक्काम, वारकऱ्यांचा शहरातील फेरफटका, मुक्कामाच्या ठिकाणी लागलेले ट्रक, जेवणावळी, स्थानिक नागरिकांची दिंड्यांच्या बडदास्तीची लगबग, त्यांच्या चहा-नाश्त्यापासून ते जेवण, विश्रांतीच्या व्यवस्थेची तयारी या सगळ्यांमध्ये दोन दिवस कसे निघून जातात हे समजत नाही. याशिवाय पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी दर्शनाची गर्दी आणि त्या भागाला आलेले जत्रेचे स्वरूप या सगळ्या गोष्टीं यंदा होणार नाही.
पालख्यांच्या निमित्ताने शहरात विविध गोष्टींची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. पुण्यापासून लोणंदपर्यंत वारकऱ्यांची विविध गावांमध्ये बडदास्त चांगली होते, त्यानंतर मात्र पालख्यांना वेशीवर सोडण्यासाठी गेलेले लोक आपापल्या भागात परततात आणि पुढे पालखीबरोबर जाणाऱ्यांची संख्या कमी होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमार्गे पुढे जाते, त्यावेळी लोणंदपर्यंत वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था गावकऱ्यांमार्फत होते; परंतु पुढच्या प्रवासात लागणारा वारकऱ्यांचा शिधा प्रत्येक दिंडी प्रमुखांकडून पुण्यातूनच खरेदी केला जातो.
अंदाजित उलाढाल…
गव्हाचे पीठ, तांदूळ, रवा, साबुदाणा, शेंगादाणे, तेल, चहापावडर, साखर, गॅस सिलिंडर, कडधान्य, दिंडीमध्ये वाटण्यासाठी लागणारा भेळभत्ता या सगळ्या गोष्टींची तयारी दिंड्यांचे मालक पुण्यातच करतात. गाड्यांमध्ये वारकऱ्यांसाठी लागणारा माल पुण्यात भरून घेतला की, वारी संपवून परतेपर्यंत तो पुरतो. ही संपूर्ण उलाढाल सुमारे चार कोटी रुपयांची असते; परंतु वारकऱ्यांसाठी ज्या ज्या गोष्टी सामान्य रहिवाशांकडून केल्या जातात, त्याचीही उलाढाल सुमारे दहा कोटी रुपयांच्या घरात आहे.
व्यापाऱ्यांचे नुकसान…
दिंड्यांची खरेदी पुण्यातच होते. त्यांची पुण्यात ठरलेली दुकाने असतात. त्यांच्याकडून ते माल उचलतात. प्रत्येक दिंडीची स्वत:ची जेवणाची व्यवस्था केलेली असते. आळंदी, देहूहून मुख्यत्त्वे पालख्या पुढे निघत असल्याने त्यांचा माल पुण्यातच भरला जातो. अन्नधान्याव्यतिरिक्त प्रामुख्याने इंधन म्हणजे सिलिंडरही येथूनच ते घेऊन जातात. याशिवाय वारीमध्ये भेळभत्ता देतात त्यासाठी 300 किलोंपेक्षा जास्त फरसाण, चुरमुरे यांचे पुढे दिंडेकरी बनवून घेऊन जातात. तेही यंदा होणार नसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.
रेनकोटलाही मागणी नाही…
आषाढी एकादशीपर्यंतचा त्यांचा पूर्ण 15-20 दिवसांचा प्रवास हा पावसाळ्यातच असतो. त्यामुळे अनेक व्यापारी, संस्था, संघटना, मंदिरे यांच्याकडून त्यांना रेनकोट वगैरेचे वाटप केले जाते. त्यामुळे त्याची उलाढाल मोठी असते. तीही यंदा होणार नाही.