विठुभेटीचा वारकऱ्यांनी केला धावा

संत तुकाराम महाराजांची पालखी वाखरी येथे मुक्कामी

– नीलकंठ मोहिते

पिराची कुरोली –
सिंचन करिता मूळ
वृक्ष ओलावे सकाळ।
तुका म्हणे धावा
आहे पंढरी विसावा।।
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बोरगाव येथील आपला मुक्काम आटपून सकाळच्या प्रहरी माळखांबी तोंडले-बोंडले टप्पा मार्गी पिराचा कुरोली येथे परंपरेने चालत आलेला हरिनामाचा जयघोष करीत धावा करून मुक्कामासाठी दाखल झाला. यावेळी सासवड येथून निघालेल्या संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याची भेट येथील भेट सोहळ्यातील खास आकर्षण ठरले.

क्षेत्र पंढरीच्या वाटेवर तोंडले-बोंडले टप्पा या पंढरीच्या वाटेवर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे तुकोबांच्या पालखी सोहळ्याचा व माऊलींच्या पालखी सोहळ्याचा धावा होतो. या धाव्याचा खऱ्या अर्थाने अर्थ असा आहे की, पंढरीच्या वारीला जात असताना या ठिकाणी आल्यानंतर पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिराचा कळस दिसतो, त्यामुळे तुकोबाराय पंढरीकडे धावतात, अशी कथा सांगितली जाते. ज्या ठिकाणी उतार सुरू होतो, तिथे दिंड्या आल्याची चोपदार एकामागे एक दिंड्या सोडतात. वारकरी याची तमा न बाळगता विठ्ठल..विठ्ठल..माऊली..माऊली धावा करतात. हाच दावा जोशपूर्ण वातावरणात तुकोबारायांच्या पालखीतील वारकऱ्यांनी प्रतीप्रमाणे केलेला आहे.

माळखांबी ग्रामपंचायतीच्या वतीने तुकोबारायांच्या पालखीचे पुष्पांचा वर्षाव करीत स्वागत करण्यात आले. या प्रसंगी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, अशोक महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे, संजय महाराज मोरे, सिंग वादक पोपटराव तांबे, मुख्य चोपदार अर्जुन निवृत्ती, चोपदार विनायक रणेर, महादेव शिंदे, पालखीतील छत्रीधारी दत्तू जाधव, प्रकाश सोळंके, भिकाजी साठे, नितीन आढागळे यांचा व पालखी प्रमुखांचा सन्मान माळखांबी गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.

माळखांबी येथे दुपारची विश्रांती व न्याऱ्ही करून पालखी सोहळा धावा करण्यासाठी तोंडले-बोंडले गावाच्या हद्दीत मार्गस्थ झाला. या ठिकाणी पालखी सोहळा सोबत चालणारे तरुण वृद्ध वारकरी कोणतीही तमा न बाळगता वाऱ्याच्या वेगाने पंढरीच्या दिशेकडे धावत असतात, हे दृश्‍य पाहण्यासाठी लाखो नागरिकांनी गर्दी केली होती. माळखांबी परिसर व टप्पा भागातील नागरिकांनी पालखी सोहळ्याचे तोफांच्या सलामीने स्वागत केले. काही क्षणाचाही विलंब न लागता पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, अशी गर्जना करीत माऊली माऊली, असा गगनभेदी आवाज करीत वारकरी धावले, तद्‌नंतर पालखी सोहळा टप्पा पार करीत रात्री उशिरा पिराची कुरोली येथे सोहळा मुक्कामासाठी दाखल झाला. बुधवारी (दि. 10) वागड वस्ती भंडिशेगाव मार्गी बाजीराव विहिरीवर दुसऱ्या मानाच्या उभ्या रिंगणासाठी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जाणार आहे. येथूनच वाखरी येथील संताच्या मेळ्यात तुकोबांचा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख मधुकरमहाराज मोरे यांनी दिली.

आज गोल रिंगण…
बुधवारी (दि.10) संतांचे पालखी सोहळे शेवटच्या वाखरी मुक्कामासाठी मार्गस्थ होतील. बाजीराव विहीर येथे दुपारी संत ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यातील उभे व गोल रिंगण तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.