पुणे – माऊलींच्या पालखी सोहळ्याने आज पुण्यातून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. लाखो वारकऱ्यांचा मेळा आता दिवे घाटात दाखल झाला आहे. सध्या दिवेघाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून पाऊस सुरू झाल्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भर पावसात नाचत- गात वारीचा आनंद घेत वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे.
तसेच पुणे ते दिवे घाटापर्यंत पालखी सोहळ्यात मोठय़ा संख्येने पुणेकर सहभागी झाले आहेत. यामध्ये युवक-युवतींचीही संख्या मोठी आहे. डोंगरमाथ्यावर हजारो भाविकांनी पालखी सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.
दरम्यान, आळंदीहून निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी बुधवारी पुण्यात मुक्कामी होती. पुणे शहरातील भवानी पेठेतल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये या पालखीचे दोन मुक्काम असतात. शुक्रवारी सकाळी सहा वाजता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आज पुण्यातून सासवडच्या दिशेने प्रस्थान केले.