-प्रशांत जाधव
सातारा – अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला पांडूरंग भक्तांची परिक्षा घेण्यासाठी जसा विविध रुपे घ्यायचा, अगदी तशीच वारकऱ्यांच्या मौल्यवान वस्तूवर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांच्या हातात बेड्या ठोकण्यासाठी यंदाही सातारा पोलीस खासकरून स्थानिक गुन्हे शाखा वारकऱ्यांच्या वेशात पालखी सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 2 जुलै रोजी सातारा जिल्ह्यात दाखल होत आहे. हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडेपर्यंत सातारा पोलिस दलातील हजारो कर्मचारी त्यावर लक्ष ठेवून असतील. ज्ञानेश्वर महाराज पालखी लोणंद ते सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत जाईपर्यंत सातारा पोलीस दलातील अधिकारी व पोलिस तैनात राहणार आहेत.
सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. वारी मार्गावर ठिकठिकाणी दहशतवादविरोधी पथके तैनात करण्यात आली आहेत. पालखी सोहळ्यातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर’चा आधार घेण्यात आला आहे. दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी ठिकठिकाणी दहशतवादविरोधी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
“वारीचा सोहळा हा वारकऱ्यांसाठी पर्वणीचा सोहळा असतो. त्यामुळे हा सोहळा शांतपणे पार पाडण्यासाठी व वारी मार्गावर वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस दल सक्षमपणे काम करत आहे. विविध पथकांच्या माध्यमातून वारीच्या मार्गावर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.
-तेजस्वी सातपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक
पालखीत हजारो वारकरी आणि नागरिक सहभागी होतात. त्यामुळे सोहळ्यावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. वारी मार्गावरील खासगी सीसीटीव्हीचीही पोलिस मदत घेणार आहेत. वारी मार्गावर सोन्याचे दागिने, पैसे, मोबाइल आणि मालमत्तेची चोरी रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस वारकऱ्यांच्या वेशात वारीत सहभागी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली.