#Wari2019 : हरिनामासोबत यंदा पर्यावरणाचा जागर ‘हरित वारी’

तीर्थक्षेत्र देहूत 160 वृक्षांची लागवड : 501 वड, पिंपळ,कडुलिंबाची करणार लागवड

पिंपरी – आजची परिस्थिती कशी असेल, हे बहुधा शेकडो वर्षांपूर्वीच संतश्रेष्ठ तुकोबारायांनी ओळखले असावे, म्हणूनच त्यांनी एका अभंगाच्या माध्यमातून वृक्षलागवड व संवर्धनाचा संदेश दिला होता.

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’

संत तुकाराम महाराजांच्या याच उक्‍तीला सार्थ करत त्यांच्याच देहूनगरीतून “हरित वारी’चा संकल्प साकारला जात आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेमध्ये आहे. दुष्काळाच्या या भीषण झळांच्या तीव्रता वृक्षवल्लीच दूर करु शकतात. यामुळे यंदा देहूतून हरित वारीस प्रारंभ करण्यात आला आहे. तीर्थक्षेत्र देहूत 160 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे आणि 501 वड,पिंपळ, कडुलिंब ह्या देशी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. हा उपक्रम प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती – पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालय व जैन सोशल ग्रुप डायमंड यांचे संयुक्‍त विद्यमाने राबविण्यात येत आहे.

आषाढी वारीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्राच्या कनाकोपऱ्यातून संत महतांच्या पालख्या पंढरपुराकडे रवाना होत असतात. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 350 पेक्षा जास्त दिंड्या ह्या पालखी वारी सोहळ्यात हरिनामाचा गजर करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान करतात.

दुष्काळामुळे निम्मेच वारकरी

गेल्या वर्षी परतीचा मॉन्सून बरसला नाही. यावर्षीचा उन्हाळाही अत्याधिक तीव्र होता तर मॉन्सूनच्या आगमनालाही खूप उशीर झाला आहे. यामुळे यंदाची परिस्थिती खूपच भीषण आहे. दुष्काळी परस्थितीमुळे यंदाच्या वर्षी वारकरयांची संख्या निम्म्याने घटली आहे. यासाठीच यंदा वारीमध्ये “हरित वारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. दोन दिवसांपासून देहू परिसरात, तसेच देहूरोड पोलीस ठाणे परिसरात 160 वृक्षांचे रोपन करण्यात आले. यंदाच्या वर्षी 501 वड,पिंपळ, कडुलिंब ह्या देशी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचाही या उपक्रमामध्ये मोठा सहभाग दिसून येत आहे.

“हरित वारी’ उपक्रमामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्‍त श्रीकांत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, वाहतूक पोलीस निरीक्षक दिलीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहिद सय्यद पठाण, अर्जुन पवार, पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार आणि संतोष येडे, पोलीस कर्मचारी अशोक नवले, वैशाली लोखंडे, जैन सोशल ग्रुपचे विजय मुनोत, संतोष छाजेड, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, महिला अध्यक्ष अर्चना घाळी दाभोळकर यांनी सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.