भंडारदरा धरण भरले, वीजनिर्मिती सुरू 

अकोले – भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाने आज उघडीप दिली. श्रावण सरींनी भंडारदरा पाणलोटाने आगळे वेगळे रुपडे धारण केले होते. पाणलोटातील गावांना अतिवृष्टीचा तडाखा देत या सरींनी भंडारदरा धरणाचे मन तृप्त केले. आज दुपारी दोन वाजता हे धरण तुडुंब झाले. तसेच तांत्रिकदृष्ट्या हे धरण 3 ऑगस्ट रोजी पूर्ण भरले होते. आज या धरणात 11.39 टीएमसी पाणी साठा होऊन धरण तुडुंब भरले. धरणाच्या स्पीलवे, टनेल मार्गेविसर्ग सुरू आहे.

राज्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र ठरलेल्या व उत्तर नगर जिल्ह्याच्या सिंचनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या भंडारदरा धरण भरल्याने पर्यटकांची वर्दळ वाढत आहे. त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील बळीराजाचा उत्साह दुणावला आहे. यादरम्यान धरणाच्या पाणलोटातील गावाने मात्र जीव मुठीत धरून उघडीप द्यावी, अशी वरुणराजाकडे प्रार्थना करत होते. अखेर वरुणराजाने त्यांची प्रार्थना ऐकली.

11.39 टीएमसी साठवण क्षमतेच्या या धरणात काल सकाळी 10 हजार 507, आज सकाळी दहा हजार 800 आणि दुपारी दोन वाजता 11 हजार 39 दलघफू असा पाणीसाठा झाला. त्यामुळे गेल्या चोवीस तासांमध्ये धरणामध्ये जवळपास एक टीएमसी नवीन पाण्याची आवक झाली. मागील वर्षी हे धरण 9 ऑगस्टला पूर्ण क्षमतेने भरले होते.

हे सर्व पाणी प्रवरा नदीपात्रातून निळवंडे धरणाकडे झेपावत आहे. त्यात कृष्णवंती व वाकीचा जवळपास 1100 क्‍यूसेक व भंडारदऱ्याचा विसर्ग मिळून सुमारे साडेपाच हजार क्‍यलुसेक विसर्ग निळवंडे धरणाकडे झेपावतो आहे. त्यामुळे हे धरणही आगामी चार ते पाच दिवसांच्या काळात भरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर निळवंडे धरणामध्ये दुपारी 7 हजार 876 दशलक्ष घनफुटांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. हे धरण तांत्रिकदृष्ट्या भरले असून, नजीकच्या काळामध्ये हे धरण पूर्ण क्षमतेने भरेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुळा धरणामध्ये 2 हजार 5779 दशलक्ष घनफूट, तर आढळा धरणामध्ये 1060 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. जायकवाडी धरणामध्ये 96.105 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये तालुक्‍यात झालेली पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : रतनवाडी-97, पांजरे-70, वाकी-47, भंडारदरा-72, निळवंडे-10, आढळा-10, अकोले-05, कोतूळ-01.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.