सातारा – सातारा, कराडसह जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या प्रभागरचनेवर उद्या, दि. 7 रोजी निवडणूक आयोगाकडून शिक्कोमार्तब होणार आहे. प्रभागरचनांवर आलेल्या हरकती निकालात काढण्यात आल्यानंतर अंतिम प्रभागरचना तयार झाली आहे. ही प्रभागरचना आयोगाकडून मंगळवारी प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यानंतर आठवडाभरात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
साताऱ्यासह जिल्ह्यातील आठ पालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी नव्याने प्रभागरचना करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक प्रशासनास दिली होती. त्यासाठी दिलेल्या निकष, नियमांनुसार प्रभागरचना करण्यात आली. हे काम अंतिम टप्प्यात असताना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे प्रभागरचना रखडली होती. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणूक आयोगाने प्रभागरचनेची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.
सातारा शहराच्या हद्दवाढीनंतर पालिकेत आलेल्या शाहूपुरी, विलासपूर, शाहूनगर व इतर भागांचा समावेश करून द्विसदस्यीय 25 प्रभागांची रचना करण्यात आली. त्यावर 29 हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. हरकतींवर सुनावणी घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रभागरचनेचे अंतिम प्रारूप निवडणूक आयोगाला सादर केले. आयोगाकडून सर्व पालिकांची अंतिम प्रभागरचना उद्या (मंगळवार) जाहीर होणार आहे. प्रभाग निश्चितीनंतर सर्वांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागणार आहे. त्याचा कार्यक्रम आठवडाभरात जाहीर होईल, असा अंदाज आहे.