सार्वजनिक बांधकाम खात्याचा काणाडोळा : वाहतुकीसाठी मार्ग बंदच
भोर – गेल्या तीन महिन्यांपासून भोर-महाड मार्गावर अतिवृष्टीने दरडी कोसळून अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे चर पडले असून वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 75 लाख रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून पाऊस बंद झाला आहे.
चार-पाच ठिकाणी रस्ता वाहतुकीस धोकादायक
मात्र, भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील रस्त्यांची चाळण झालेली असताना, तसेच अतिवृष्टीने घाट मार्गावरील शिरगांव आणि उंबार्डे गांवच्या हद्दीतील रस्त्याला मोठे चरे पडून रस्ता वाहून गेला असताना आणि चार-पाच ठिकाणी रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला असून देखील या रस्त्याकडे भोरच्या सार्वजनिक बांधकाम विभाग काणाडोळा करीत आहे. महाड-वरंधा घाट मार्गाचे काम सुरू होऊ शकते, तर भोर-वरंधा घाट रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग का करू शकत नाही, असा प्रश्न या मार्गावरील प्रवासी करीत आहेत.
पर्यायी रस्त्याचा प्रवाशांना फटका –
घाट रस्ता तीन महिन्यांपासून बंद असल्याने भोरमार्गे महाडकडे जाणारे भाजीपाला व्यापारी आणि प्रवाशांना महाबळेश्वर, वाई, किंवा कसेळीमार्गे महाडकडे जावे लागत असल्याने पर्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे. या मार्गाने महाड व इतर ठिकाणी पुरवठा करणाऱ्या भाजीपाला व्यापाऱ्यांनाही लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागत असल्याने भाजीपाल्याचे दर आवाक्याबाहेर जात आहेत.
भोरच्या सार्वजनिक बांधकाम खात्याची उदासीनता –
वरंधा घाटातील वाघजाई माता मंदिरापर्यंत भोर तालुक्याची हद्द असून तेथून पुढे महाड (जि. रायगड) ची हद्द सुरू होते. महाडकडे जाणाऱ्या घाट रस्त्याचीही अशीच अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी अवघड वळणाच्या रस्त्यावर चर पडून रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून या मार्गावरील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असला तरी महाडकडून वरंधा घाट रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, भोर-महाड मार्गावर भोरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने एकही खडा या मार्गावर टाकलेला नाही.
घाटात दरडी कोसळल्याने रस्त्याची दुरवस्था –
भोरसह संपूर्ण तालुक्यात 3 ते 13 ऑगस्ट या काळात अतिवृष्टी झाली. त्यावेळी घाटमार्गावरील हिर्डोशी, शिरगांव, उंबार्डे ते वाघजाई माता मंदिरापर्यंत रस्ता खचल्याने काही ठिकाणी दरडी कोसळून रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे पडले आहेत.संपूर्ण रस्ताच उखडलेला आहे. साईड पट्ट्यांचा तर लवलेशही नाही.
11 कोटींचा निधी मंजूर –
घाटरस्त्यासाठी 11 कोटींचा निधी मंजूर असूनही रस्त्याचे काम रखडलेले आहे. पावसाळा सुरुरू होण्यापूर्वी भोर-वरंधा घाट रस्त्याच्या खडीकरणासाठी आणि डांबरीकरणासाठी आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नाने 9 कोटी 72 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ठेकेदाराने या मार्गाचे काम सुरू केले होते. अतिवृष्टीीच्या काळात ठेकेदाराने केलेले रस्त्याचे काम वाहून गेले आहे. या रस्त्याची दुरुस्तीसाठी सरकारने पुन्हा 1 कोटी 75 लाखांचा निधी मंजूर केला आहे. सुमारे 11 कोटींचा निधी मिळूनही रस्ता “जैसे थे’ अवस्थेतच आहे.