ज्ञानेश्वर फड/ प्रीतम पुरोहित
वेळापूर – “वारी काळात अनेक वारकऱ्यांना चालून चालून थकवा येतो. त्यांची शारीरिक ऊर्जा कमी होते. वाटेतील फिरते दवाखाने त्यांना औषधे देतात. अशा वेळी तत्काळ उपाय म्हणून इंजेक्शन, सलाइन देऊन बरे करतो. ग्रामीण भागांतील अनेक लोक इंजेक्शन किंवा सलाइन आहेत का,’ असे विचारतात, असे डॉ. नंदकिशोर बोरसे यांनी सांगितले.
“वारकऱ्यांची सेवा म्हणजे प्रत्यक्ष माउलींची सेवा. आमच्या आई-वडिलांनी 30 वर्षापूर्वी ही वैद्यकीय सेवा सुरू केली. आज आम्ही ती पुढे नेत आहोत. आसाराम मूलचंद चांडक अणि टिळक आयुर्वेद महाविद्यालय यांच्या विद्यमाने माउलींच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची सेवा करत आहोत,’ असे नारायण चांडक यांनी सांगितले.
“वारी काळात वारकरी पायी चालून थकतात. काहींच्या पायाला जखमा होतात. यात अनेक जण वयाची साठी ओलांडलेले भाविक सहभागी असतात. त्यांना गोळ्या-औषधांसोबतच तत्काळ उपाय म्हणून इंजेक्शन किंवा सलाइन आम्ही उपलब्ध करून उपचार करतो. त्यामुळे त्यांचा वारीतील प्रवास सुकर होतो,’ असे चांडक यांनी सांगितले.
8 ते 10 लाखांची औषधे
वारी काळात वारकऱ्यांना दररोज 200 पेक्षा अधिक जणांना सलाईन तर 500 हून जास्त लोकांना इंजेक्शन देत आहोत. सोबतच छोटी शस्त्रक्रिया (टाके) देखील आम्ही करतो. जखमांना मलमपट्टी करण्यात येते. जवळपास 17 दिवसांच्या काळात 8 ते10 लाख रुपये खर्च येतो, असे या पथकाने सांगितले.
जागा मिळेल तिथे उपचार
वारकऱ्यांना लवकरात लवकर उपचार मिळावेत, यासाठी जागा मिळेल तिथे उपचार केले जातात. रोज सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत ही सेवा पुरविली जाते. रुग्णाहिकेसमोर मोकळ्या जागेत ताडपत्री टाकून तेथेच प्रथमोपचार केले जातात. काही ठिकाणी पाऊस असल्यास वारकऱ्यांच्या राहुट्यांमध्ये उपचार केले जातात.
सर्व जण एमडी डॉक्टर्स
सध्या सेवेत सर्व जण एमडी पदवीप्राप्त डॉक्टर्स आहेत. पुणे ते पंढरपूर या पालखी मार्गावर 17 दिवस तीन ग्रुपमध्ये हे काम करतात. यात रुग्णाला यात महिला अणि पुरुष डॉक्टर यांची संख्या 12 पेक्षा जास्त आहे. मदतीस वेगळा समूहदेखील त्यांच्यासोबत आहे.
दररोजची सेवा (सरासरी)
200 पेक्षा जास्त लोकांना ऍडमिट
500 हून अधिक इंजेक्शन
160 हून अधिक लोकांना मलमपट्टी
100 पेक्षा अधिक लोकांवर छोटी शस्त्रक्रिया
फलटण येथे दोन दिवस पालखी मुक्कामी असताना एकाच दिवशी सुमारे 750 वारकऱ्यांवर योग्य औषधोपचार करण्यात आले. त्यामुळे त्यांचा थकवा कमी होऊन त्यांना वारीच्या प्रवासासाठी उर्जा मिळाली.