काबूल – उत्तर अफगाणिस्तानमधील पंजशीर आणि अन्य भागात तालिबानने जोरदार हल्ला चढवला आहे. पंजशीर प्रांतात तालिबानने जरी विजयाचा दावा केला असला तरी अद्याप तेथे तालिबानला पूर्ण ताबा मिळवता आलेला नाही. तालिबानविरोधी गटांकडून तेथे तालिबानला जोरदार विरोध केला जातो आहे. पंजशीर खोऱ्यामध्ये अजूनही दोन्ही बाजूच्या सशस्त्र गटांकडून जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. सध्या पंजशीर या एकाच प्रांतावर तालिबानचे नियंत्रण नाही.
पंजशीर प्रांतातील अनाबा, शोटुल, रुहका आणि बाजारक हे जिल्हे तालिबानच्या ताब्यात आहेत, असे दिसते आहे. दारा हा जिल्हा देखील तालिबानच्या नियंत्रणात असल्याचीच चिन्हे दिसत आहेत, असे अमेरिकेच्या एका संकेतस्थळाने म्हटले आहे. परयाम येथे जारात युद्ध सुरू आहे. आज सकाळपासून पंजशीरमधील विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे 600 तालिबानी ठार झाले आहेत. तर 1 हजारापेक्षा अधिक तालिबान्यांना एकतर पकडण्यात आले आहे किंवा त्यांनी आत्मसमर्पण केले आहे, असे विरोधी दलांचे प्रवक्ते फहिम दश्ती यांनी सांगितले. अफगाणिस्तानमधील अन्य प्रांतांमधून रसद मिळणे तालिबानला मुश्कील झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
पंजशीरमधील इतर जिल्हे तालिबानपासून सुरक्षित आहेत. अफगाणिस्तानमधील प्रसिद्ध कमांडर अहमद शाह मसूदचे पुत्र अहमद मसूदच्या नियंत्रणाखाली या जिल्ह्यांचे रक्षण केले जात आहे. तालिबानकडून ड्रोनच्या आधाराने बॉम्बफेक करू लागले आहेत. हे ड्रोन पाकिस्तानच्या विशेष दलांकडूनच मिळवले गेले आहेत, हे उघड आहेत, असे विरोधी दलांकडून सांगितले गेले आहे.
तालिबानपासून आतापर्यंत वाचलेल्या या भागाला वाचवण्यासाठी मानवतावादी मदत करण्याचे आवाहन अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी संयुक्त राष्ट्राला केले आहे. पंजशीर प्रांतात आणि बागलान प्रांतातील तीन आंद्रब जिल्ह्यांमध्ये आर्थिक कोंडीमुळे मोठी मानवतावादी आपत्ती निर्माण झाली आहे, असे सालेह यांनी ,ंयुक्त राष्ट्राला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.