भारत आणि पाकिस्ताना दरम्यान युध्दाचा भडका उडणार – गुप्तचर संघटनेचा अहवाल

अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने दिला अहवाल

वॉशिग्टन – येत्या 2025 पर्यंत पाकिस्तानमध्ये पाण्याचा प्रचंड तुटवडा निर्माण होणार आहे. पाकिस्तानमध्ये पाण्याचे संवर्धन करण्याबद्दल कोणतीही पाऊले उचलली जात नाहीत. तसेच पावसाच्या पाण्याचेही नियोजन करण्यात येत नसल्यामुळे येत्या पाच वर्षात पाकिस्तानच्या एका मोठ्या लोकसंख्येला पाण्याच्या तुटवड्याला सामोरे जावे लागेल.

अशा वेळी त्या देशातील नागरिकांत सरकार विरोधात असंतोष वाढणार असून त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान भारतासोबत युद्ध छेडण्याचा प्रयत्न करेल, असे अमेरिकेच्या एका अहवालात सांगण्यात आले आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान 2025 पर्यंत एक मोठे युद्ध होण्याची शक्‍यता असल्याचा अहवाल अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने अमेरिकन सरकारला दिला आहे. अमेरिकन सरकारकडे नॅशनल इन्टेलिजन्स कौन्सिलने त्यांचा ग्लोबल ट्रेन्ड्‌स रिपोर्ट दिला असून त्यामध्ये ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे. जगातील सगळे देश आणि गुप्तचर संघटना अमेरिकेच्या या अहवालाला गंभीरपणे घेत आहेत.

दक्षिण आशियात भविष्यात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण होईल, या प्रदेशात अशांतता पसरेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याच प्रकरणात भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठे युध्द होण्याची शक्‍यता असल्याचे सांगण्यात आले आहे. हे युद्ध अनेक दिवस चालणार असून दोन्ही देशांच्या अनेक सैनिकांना यात बलिदान द्यावे लागण्याची शक्‍यताही वर्तवण्यात आली आहे.

या दोन देशांदरम्यान केवळ युद्ध होणार असे सांगितले नाही, तर त्याची कारणे काय असतील यावरही या अहवालात भाष्य करण्यात आले आहे. त्यात येत्या पाच वर्षाच्या कालावधीत भारतात मोठा दहशतवाही हल्ला होणार असल्याचे सांगितले आहे. भारत सरकार त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करेल आणि युद्ध सुरू होईल असे सांगितले आहे. या आधी भारतात पुलवामा हल्ला झाला, त्यावेळी भारताने बालाकोट सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानला उत्तर दिल्यामुळे भारतावर भविष्यात कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर देण्याचे संकेत त्या माध्यमातून देण्यात आले होते.

भारत आणि चीन या दोन देशांच्या संबंधावरही या अहवालात भाष्य करण्यात आले आहे. गलवानच्या खोऱ्यात या दोन देशांच्या सैनिकांमध्ये जी झडप झाली तशीच एखादी घटना येत्या पाच वर्षात पुन्हा घडण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. हे वगळता भारत आणि चीन दरम्यान कोणतेही युध्द होणार नसल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

दक्षिण आशियाच्या प्रदेशात भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण करणारा आणखी एक विषय अफगाणिस्तानचा असेल. अमेरिकेने जर अफगाणिस्तानला तालिबानच्या हाती सोडून दिले, तर ती पाकिस्तानसाठी सुवर्ण संधी असेल. तालिबानशी पाकिस्तानचे संबंध लक्षात घेता या प्रदेशात अनेक दहशतवादी गटांना प्रशिक्षित करण्यात येईल आणि त्याचा वापर काश्‍मिर तसेच भारतातील इतर दहशतवादी कारवायांसाठी करण्यात येईल. त्यामुळे अफगाणिस्तानचे भविष्य काय असेल त्यावरच या प्रदेशाचे भविष्य ठरणार असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.