वानवडी परिसर वाहतूक कोंडीमुक्‍तकरणार – बागवे 

पुणे – फातिमानगर, वानवडी परिसरात गेल्या काही वर्षांत वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली आहे. त्यामुळे वाहनचालक आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना तातडीनं करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांनी या भागातील मतदारांना दिली.

बागवे यांच्या प्रचारार्थ शनिवारी वानवडी, फातिमानगर भागात प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी या भागातील मतदारांनी या भागातील वाहतूक कोंडीच्या तक्रारींचा पाढाच बागवे यांच्यासमोर वाचला.

यावेळी कोंडी फोडण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व बाबींचा पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. बागवे यांच्यासह माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर प्रशांत जगताप, साहिल केदारी, शिवाजी केदारी, अभिजित शिवरकर यांच्यासह या भागातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मतदारांशी संवाद साधताना बागवे म्हणाले की, या भागात मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढले असले, तरी अद्यापही मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित आहेत.

प्रामुख्याने गेल्या तीन ते चार वर्षांत या भागात जगताप चौकासह इतर परिसरातही वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. ही समस्या सोडविण्यासाठी दीर्घकालीन तसेच तातडीच्या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. ती आपण करणार आहोत. राज्यात महाआघाडीच्या उमेदवारांना मोठा पाठिंबा मिळत असून या भागातील जागरूक मतदारही आश्‍वासनांना न भूलता आपल्याला पुन्हा एकदा संधी देतील, असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी मतदारांना केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)