लखनौ – आपल्याला पंतप्रधान बनण्याची ईच्छा आहे, राष्ट्रपती बनण्याची इच्छा नाही, अशा शब्दात बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांना सुनावले आहे. बसपाचे काही वरिष्ठ नेते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटल्यानंतर “मायावती राष्ट्रपती बनण्याच्या प्रयत्नात आहेत,’ अशी खोचक टीका अखिलेश यांच्याकडून केली जायला लागली होती. त्याला मायावती यांनी हे उत्तर दिले आहे.
मला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनायचे आहे. देशाचे पंतप्रधान बनायचे आहे. राष्ट्रपती नाही. ऐषोआरामाचे जीवन जगण्यापेक्षा संघर्षमय आयुष्य जगण्यात आपल्याला अधिक रस आहे, असे त्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या.मायावती यांचे सहकारी आणि पक्षाचे सरचिटणीस आणि बसपाचे उत्तर प्रदेशातील एकमेव आमदार उमा शंकर सिंह यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची भेट घेतली होती.
मायावती यांनी मुख्यमंत्री असताना उभारलेल्या स्मारकांना जतन करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती, असे मायावती यांनी सांगितले. अलिकडेच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मायावती यांनी भाजपला मदत केली होती. त्याबदल्यात भाजप मायावतींना राष्ट्रपती करणार असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला होता.