कुस्ती स्पर्धेसाठी पालिकेत रंगणार वादाचा ‘फड’

क्रीडा समिती अध्यक्षांना मिळेना एकही स्पर्धा


पदाधिकाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्‍त

पुणे – महापालिकेकडून दरवर्षी घेण्यात येणाऱ्या महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या संयोजनावरून महापालिकेत नाराजीनाट्याचा फड रंगला आहे. या स्पर्धा आपल्या प्रभागात व्हाव्यात असे पत्र क्रीडा समिती अध्यक्षांनी दिले असले तरी, त्यांना स्पर्धेचे संयोजन नाकारण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी स्थायी समिती निधी देणार आहे. मग स्पर्धा स्थायी समिती अध्यक्षांकडे होईल. तुम्ही फक्‍त अध्यक्ष म्हणून त्याला मान्यता द्या, असे सांगत क्रीडा समिती अध्यक्षांचीच बोळवण केली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे संतापलेल्या समिती अध्यक्ष विजय शेवाळे यांनी पालिका पदाधिकाऱ्यांविरोधात थेट नाराजी व्यक्‍त केली आहे. तसेच, समिती अध्यक्ष म्हणून आम्हाला किंमतच नाही का, असा प्रश्‍नही उपस्थित केला आहे.

महापालिकेकडून दरवर्षी शहरात महापौर चषक क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धांच्या संयोजनाचे सर्व अधिकार महापौरांना असतात, तर या स्पर्धांच्या संयोजनास क्रीडा समिती मान्यता देते, तर या खर्चास स्थायी समितीकडून मान्यता दिली जाते. या स्पर्धांमध्ये कुस्ती, कब्बडी या दोन स्पर्धांसह बॉडी बिल्डींगच्या संयोजनासाठी नगरसेवकांच्या उड्या पडतात. मात्र, या प्रमुख स्पर्धा दरवर्षी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष तसेच सभागृह नेत्यांच्या प्रभागात पळविल्या जातात. तर उर्वरित स्पर्धांचे संयोजन इतरांना दिले जाते. त्यामुळे या वर्षी कुस्ती स्पर्धा मिळावी म्हणून शेवाळे यांनी माजी महापौर मुक्‍ता टिळक यांना पत्र दिले होते. त्यावर अद्याप निर्णय झालेला नसला तरी, कुस्ती, कब्बडी तसेच बॉडीबिल्डींग स्पर्धा सोडून इतर काही स्पर्धांचे संयोजन ठरले असल्याचे त्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

त्यामुळे क्रीडा समिती अध्यक्ष असतानाही आमची बोळवळ का, असा सवाल शेवाळे यांनी उपस्थित केला आहे. तर महापालिकेची महत्त्वाची पदे पदाधिकाऱ्यांना देण्यात आली तरी कार्यक्रम आणि स्पर्धाही त्यांनाच का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे कुस्ती स्पर्धेवरून थेट क्रीडा समिती अध्यक्षांनीच दंड थोपटल्याने स्पर्धेच्या नियोजनाचा फड चांगलाच रंगण्याची चिन्हे आहेत.

क्रीडा समिती अध्यक्ष म्हणून माझ्याच मान्यतेने या स्पर्धा होणार आहेत. मात्र, असे असतानाही आम्हाला हवी ती स्पर्धा मिळत नसेल तर अध्यक्षपद आम्हाला काय नावाला दिले आहे का? प्रत्येकवेळी मुख्य पदाधिकाऱ्यांचीच मनमानी असते. ही बाब संयोजनासाठी पुढाकार घेणाऱ्या आमच्या सारख्या नगरसेवकांवर अन्यायकारक बाब आहे. त्यामुळे नवनिर्वाचित महापौरांना पत्र देणार असून याबाबत गांभीर्याने विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची मागणी केली जाणार आहे.
– विजय शेवाळे, अध्यक्ष, क्रीडा समिती

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.