केंद्र चालकांची मनमानी : गरजूंना वेठीस धरण्याचे प्रकार
बॅंकाही करतात अडवणूक
पुणे – आधार कार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारीख दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांकडून फक्त 50 रुपये घेणे अपेक्षित असताना आधार केंद्रचालक नागरिकांकडून 500 रुपये घेत असल्याचा प्रकार घडत आहे. सध्या आधार केंद्रावर दुरुस्तीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. याचाच गैरफायदा घेत आधार केंद्र चालक नागरिकांकडून जादा पैसे उकळत आहे.
पंतप्रधान विमा योजना, गॅस सिलिंडर अनुदान, बॅंक खाते, पॅन कार्ड, रेशनकार्ड, विविध प्रकारच्या शिष्यवृती, रोजगार हमी योजना, नवीन मोबाइल क्रमांक घेणे, कर्जमाफी योजना आदी प्रकारच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. आता सर्वच बाबींसाठी आधार आवश्यक असल्याने आधार कार्डमधील माहिती बारकाईने पाहत आहे. यामुळे आधार कार्डमधील चुका लक्षात येऊ लागल्या आहेत. जन्मतारीख पूर्ण नसणे, नाव, पत्ता चुकीचा या कारणाने आधार दुरुस्तीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे.
बॅंकाही करतात अडवणूक
आधार केंद्र सध्या काही बॅंक आणि बीएसएनएलच्या कार्यालयामध्ये सुरू आहेत. बॅंकेमधील आधार केंद्रावर गेले असताना बॅंकेच्या ग्राहकांना प्राधान्य दिले जाते. संबंधित नागरिक बॅंकेचा ग्राहक नसेल, तर त्या व्यक्तीची आधार कार्डमधील दुरुस्ती केली जात नसल्याचे नागरिक सांगत आहेत.
असा चालतो गोरखधंदा
आधार कार्डवर जन्मतारीख अपूर्ण असल्याने नागरिक आधार केंद्रावर जातात. तेथे केंद्र चालक “प्रतिज्ञापत्र घेऊन यावे लागेल,’ असे सांगत अन्य कागदपत्रांची मागणी करतो. जन्म तारखेच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला असतानाही अन्य कागदपत्रे आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. या अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून नागरिकांना वेठीस धरले जाते. “आम्हीच प्रतिज्ञापत्र करतो, अन्य कागदपत्रे गोळा करतो, आम्हाला 500 रुपये द्या,’ असे केंद्रचालक सांगतात. शेवटी नाईलास्तव नागरिक 500 रुपये देण्यासाठी तयार होतो आणि 500 रुपये देऊन नागरिकांना आधार कार्ड मिळते.