नवी दिल्ली – माझी 21 वर्षांची कारकीर्द झाली आहे. त्यामुळे 2024च्या पॉरिस ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी फिटनेस आणि कामगिरीवर बरेच काही अवलंबून असेल. पण मला आणखी एक ऑलिम्पिक खेळायचे आहे.
जोपर्यंत माझ्या संघातील सदस्यांनी मला बाहेर काढले नाही, तोपर्यंत मी निश्चितपणे संघात राहीन, असे भारताचा अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश म्हणाला. केरळच्या 33 वर्षीय श्रीजेशला नुकतेच एफआयएच वार्षिक पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी श्रीजेश म्हणाला, कोणताही खेळाडू ऑलिम्पिकला नाही म्हणणार नाही. प्रत्येक खेळाडू ही स्पर्धा प्रेरणादायी आहे. पण खेळाडूंच्या आयुष्यात काहीही निश्चित नसते, असे त्याने सांगितले.
दरम्यान, श्रीजेशचे माजी सहकारी खेळाडू रुपिंदर पाल सिंग, बीरेंद्र लाकरा आणि एसव्ही सुनील यांनी तरुणांसाठी मार्ग मोकळा करण्यासाठी ऑलिम्पिक मोहिमेनंतर नुकतीच निवृत्ती घेतली आहे.