तत्काळ पासपोर्ट मिळवायचाय?

परदेशात जाण्याचे आकर्षण सर्वांनाच असते. कोणी फिरण्याच्या निमित्ताने, कोणी शिक्षणासाठी, कोणी नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाण्याचा ट्रेंड वाढला आहे. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट गरजेचे असते, ही सांगण्याची गरज नाही. भारतीय पासपोर्ट विभागाने देशातील सर्व नागरिकांना पासपोर्ट देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले असून त्यादृष्टीने पासपोर्ट मेळावे आयोजित केले जात आहेत. तरीही बहुसंख्य मंडळी अजूनही पासपोर्टपासून वंचित आहेत. अशा स्थितीत जर एखाद्यास परदेशात जाण्यासाठी संधी मिळाली असेल आणि त्याकडे पासपोर्ट नसेल तर त्यासाठी तत्काळ पासपोर्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नियमित पासपोर्टला महिन्याचा कालावधी लागतो तर तत्काळ पासपोर्ट हा काही दिवसातच मिळतो. अर्थात यासाठी शुल्क अधिक आकारले जाते. साधारणपणे 3500 रुपये शुल्क असते. मात्र त्यासाठी कोणत्या कागदपत्राची गरज असते, हे जाणून घ्या.

पासपोर्ट तयार करण्याची प्रक्रिया ही दीर्घकाळ चालणारी आणि थकवा आणणारी आहे. या प्रक्रियेमुळे बहुतांश मंडळी पासपोर्ट काढण्यास टाळाटाळ करतात. मात्र कधी ना कधी पासपोर्ट काढण्याची गरज भासते. अशा स्थितीत तत्काळ पासपोर्ट कामाला येतो. सामान्य पासपोर्ट सेवेच्या तुलनेत हा पासपोर्ट लवकर मिळतो. तत्काळ पासपोर्ट योजनेतंर्गत अर्जदाराला अर्जाबरोबरच अतिरिक्त कागदपत्रांबरोबर शुल्कही भरावे लागते. पासपोर्ट जारी झाल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनही केले जाते.

तात्काळ पासपोर्ट योजना : तात्काळ योजनेतंर्गंत अर्जदाराला अतिरिक्त दोन हजार रुपये भरावे लागतात. जर आपले वय 18 पेक्षा अधिक असेल तर आधार कार्ड, ई आधार नंबर, जन्मतारखेचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र या कागदपत्रांची गरज भासते. हा पासपोर्ट तीन दिवसांत तयार होतो. यासंबंधी अधिक माहितीसाठी इ-पासपोर्ट सेवा संकेतस्थळास भेट देणे उपयुक्त ठरेल.

– स्वरदा वैद्य

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.