बारामती : मागच्या काही दिवसांपासून बीड जिल्हा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. खून, गोळीबार, खंडणी अशा विविध गुन्हेगारी घटना मागच्या काही दिवसांपासून समोर येताना दिसत आहेत. त्यामुळे बीडची तुलना बिहारशी केली जात आहे. एकीकडे बीडमध्ये सरपंच खून प्रकरण गाजत असताना आता भाजपच्या आमदार आणि कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडसंदर्भात एक मोठं विधान केले आहे.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?
मला बीडचा बारामती करायचा आहे, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी बारामतीत झालेल्या विकासकामांचं तोंडभरून कौतुक केलं. बारामती मतदारसंघातील प्रत्येक कामांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते, असाच विकास मला बीडमध्ये करायचा आहे, अशा आशयाचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यांनी आज बारामतीतील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
“बारामतीच्या विकासाशी अजितदादांचे वेगळे नाते निर्माण झाले आहे, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवासह अनेक वर्षे सत्तेत असल्याचा फायदा बारामतीच्या विकासात निश्चित झालेला आहे. बारामतीत झालेल्या विकासकामांच्या धर्तीवरच माझ्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन,” असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
बारामतीतील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे,खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी संचालक अजित जावकर, नाबार्डच्या रश्मी दराड, मायक्रोचे इंडियाचे चेअरमन राजेंद्र बारवाले, एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार, चेअरमन राजेंद्र पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.