अभिनेते मकरंद अनासपुरे यांची उमरकांचन गावास भेट
सणबूर – गेल्या काही महिन्यांपासून ढेबेवाडी जवळील मालदन या गावांमध्ये “प्रेमी’ या मराठी चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल. एवढेच काय तर वांग मराठवाडी धरणाच्या जलाशयालगत असलेल्या उमरकांचन या गावांमध्ये “टफ’ या मराठी चित्रपटाचे शुटिंग सुरू होत असून त्यांची तयारी पाहण्यासाठी स्वतः मकरंद अनासपुरे यांनी उमरकांचन गावाला भेट दिली. एकूणच निसर्गरम्य वांग खोऱ्याची मराठी फिल्म इंडस्ट्रीजला भुरळ पडली असल्याचे यावरून दिसून येते.
पाटण तालुक्यातील निसर्गाने हिंदी-मराठी फिल्म इंडस्ट्रीजला नेहमीच भुरळ घातलेली आहे. याअगोदर अनेक हिंदी-मराठी चित्रपटांचे कोयना धरण, नेहरू गार्डन, घाटमाथा, वनकुसवडे, खळे, बनपुरी यासारख्या निसर्गरम्य परिसरामध्ये मराठी-हिंदी चित्रपट, मालिकांचे शुटिंग झाले आहे. अगदी अलिकडे गाजलेले मराठी चित्रपट “काळूबाईच्या नावाने चांगभलं’ असो की “बळीराजाचे राज्य येऊ दे’ असो यांचे बहुतांशी शुटिंग याच विभागात झाले आहे.
या विभागातील चित्रपट निर्माते अरुण कचरे यांनी या विभागाची नव्याने ओळख सिनेजगताला करून दिली आहे. अनेक लहान-मोठे चित्रपट, टी. व्ही. मालिकांचे शुटिंग या परिसरात नेहमी चालू असते. यानिमित्ताने या परिसरातील लोकांना रोजगार तर उपलब्ध होत आहेत. शिवाय स्थानिक कलाकारांना कला सादर करता येणार आहे.
यातूनच पुढे सागर कारंडे, संतोष साळुंखे सारखे गुणवंत कलाकार भविष्यात नावारूपाला येतील हे नक्की. गेल्या काही महिन्यांपासून ढेबेवाडी जवळील मालदनमध्ये “प्रेमी’ चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. लवकरच हा चित्रपट रिलीज देखील होणार आहे. तर उमरकांचनमध्ये “टफ’ या चित्रपटाचे शुटिंग सुरू होत आहे. त्यांची तयारी पाहण्यासाठी स्वतः मकरंद अनासपुरे यांनी उमरकांचन गावाला नुकतीच भेट दिली. या चित्रपटामध्ये नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यासारखे नामांकित कलाकारांचा सहभाग आहेत.
जवळपास 15 दिवस या परिसरामध्ये शुटिंग सुरू आहे. अनेक दिग्गज कलाकारांना जवळून पाहण्याची एक नामी संधीच ग्रामीण भागातील लोकांना मिळणार आहे. दरम्यान ढेबेवाडी खोऱ्यात चित्रपट निर्मितीच्या अनुषंगाने या भागातील लोकांना रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. तसेच या विभागातील धार्मिक व निसर्गरम्य ठिकाणे राज्याच्याच नव्हेतर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहेत. त्यामुळे या विभागातील लोकांमध्ये चित्रपट निर्मितीची उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे.
ढेबेवाडी विभागामध्ये वांगमराठवाडी धरण, महिंद धरण, सह्याद्रि व्याघ्र प्रकल्प, नाईकबा देवस्थान, वाल्मिकी देवस्थान यासारखी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. गेल्या काही वर्षात चित्रपट निर्मात्यांनी या परिसरात शुटिंग करण्यास पसंती दाखवलेली असून ही बाब नक्कीच चांगली आहे. यानिमित्ताने स्थानिक लोकांना रोजगार तर मिळेलच शिवाय स्थानिक कलाकारांना आपली कला दाखवण्याची संधी सुद्धा मिळेल.
जोतिराज काळे मालदन