भटकंती सह्याद्रीच्या कुशीत

पावसाळा आला की निसर्ग आपल्या अंगावर हिरवी शाल परिधान करतो. रिमझिम पाऊस, धुक्‍यामध्ये हरवलेले रस्ते आणि अंगाला स्पर्शून जाणारी आल्हाददायी थंड वाऱ्याची झुळूक व निसर्गाचे सर्वांना आपल्याकडे आकर्षित करणारे मोहक रूप म्हणजे सह्याद्री.. अशा या अविस्मरणीय सह्याद्रीच्या कुशीत भटकंतीचा मोह कोणाला आवरणार नसेल तर नवलच म्हणावं लागेल.मग काय शनिवार रविवारी दोन दिवस सुट्टी एक ट्रेक तो बनता है..

म्हणत 6 वर्षांच्या बालचमू पासून ते 60 वयापर्यंतचा जणांचा अनोळखी ग्रुप तयार झाला.. सर्व नियोजनांती छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले किल्ले शिवनेरीवर शिक्कामोर्तब करून आम्हा सर्वांचा ग्रुप सकाळी पुण्याहून शिवनेरीच्या वाटेने मार्गस्थ झाला. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे.

जुन्नरमध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. गडाच्या चारीही बाजूने दगडात कोरलेली लेणी आपले लक्ष वेधून घेतात. इतिहास असा की किल्ल्याची सातत्याने ताबेदारी बदलत होती आणि जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधवरावांनी स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले.

शिवनेरी गडावर श्रीभवानी शिवाई देवीचे मंदिर आहे. जिजाऊने देवीला नवस केला जर आपल्याला पुत्र प्राप्त झाला तर त्याला तुझे नाव ठेवेन आणि म्हणून महाराजांचे नाव शिवाजी हे ठेवले गेले. महाराजांच्या जन्मापासून वर्षाचा अवधी ते हा साधारण गडावर गेला. गडावर साधारण अर्ध्या तासात चढू शकता. गडावर येतांना सात दरवाजे लागतात.या सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाटसोडून उजव्या बाजूने पूढे गेल्यावर शिवाई देवीचे मंदिर लागते.

अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात, एक वाट समोरच असणार्या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगाह आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते, याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात. जिजाऊच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी, हातात छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, असे पुतळ्याचे दर्शन शिवकुंजा मध्ये आपल्याला होते. समोरच कमानी मशिद आहे आणि खाली पाण्याचे एक टाके आहे.

येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवरायांचा जन्म झाला, दुसऱ्या मजल्यावरून आसपास पाहताना नकळत मनात कल्पना येऊन जाते की जिजाऊ बाल शिवाजीला अनेक शौर्य कथा ऐकवत असतील आणि त्यांचा स्पर्श त्या सर्वत्र लागला असेल अशा पवित्र स्थानी आपण असल्याने जीवन सार्थकी झाल्याचे समाधान वाटते. साधारण तासात संपूर्ण गड पाहून होतो. अशी ही भन्नाट सफर आपणही एका दिवसात आवर्जून अनुभवू शकता.

जितेंद्र शिंदे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)