वंचित बहुजन आघाडी ठरली काँग्रेससाठी अती ‘धोकादायक’

पुणे: लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि देशात पुन्हा एकदा मोदी लाट आली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये २८२ जागा जिंकणाऱ्या भाजप व मित्रपक्षांनी सतराव्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीत ३५२ पर्यंत मजल मारली आहे. महाराष्ट्रात सुद्धा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ४८ पैकी ४१ जागांवर ताबा मिळवला. यामध्ये काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. खुद्द माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना देखील या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी काँग्रेससाठी अती ‘धोकादायक’ ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये निवडणुकीपूर्वी युतीसाठी अनेक प्रयन्त झाले पण जागा वाटपावरून दोन्ही नेते अडून होते. आंबेडकर यांनी महाआघाडीत सहभागी होण्यासाठी लोकसभेच्या १२ जागांची मागणी केली होती. मात्र ती अमान्य झाली. त्यामुळे युतीचा महाआघाडीवर विजय झाला असला तरी वंचित बहुजन आघाडी फॅक्टर महत्वाचा ठरला आहे. जवळपास १४ जागांवर वंचित बहुजनच्या उमेदवारांना पडलेल्या मतांमुळं काँग्रेस-राष्ट्रवादी व त्यांच्या मित्रपक्षांना फटका बसला आहे.

बीड, बुलढाणा, गडचिरोली चिमुर, नांदेड, परभणी, हातकणंगले, सांगली, सोलापुर, यवतमाळ वाशिम अशा मतदार संघांमध्ये वंचितने घेतलेल्या मतांमुळेच कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांना पराभवाच्या फटका सहन करावा लागला आहे. महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री वंचित आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे विजयापासून वंचित राहिले आहेत. त्यात सर्वात मोठे उदाहरण सोलापुरचे आहे. तेथील मतांच्या आकडेवारी नुसार भाजपचे विजयी उमेदवार सिद्धेश्‍वर स्वामी यांना 524985, सुशिलकुमार शिंदे यांना 366377 आणि वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना 170007 मते पडली. या मतविभागणीचा मोठा फटका सहाजिकच शिंदे यांना बसला आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. कॉंग्रेसचे आणखी एक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही या मतविभागणीचा फटका बसला आहे. नांदेड मधील भाजपचे विजयी उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांना 4 लाख 86 हजार 806 मते मिळाली. अशोक चव्हाण यांना 4 लाख 46 हजार 658 तर वंचित आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी तब्बल 1 लाख 66 हजार 196 मते घेतली आहेत.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)