मुंबई – सध्या चित्रपटगृहात सुरु असलेल्या ‘वाळवी’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला समीक्षकांनीही पसंती दर्शवली आहे. त्यामुळे सध्या ‘वाळवी’चाच बोलबाला आहे. नुकतीच ‘वाळवी’च्या टीमने ठाण्यात आयोजित झालेल्या ३३ व्या रोड सेफ्टी वीकमध्ये हजेरी लावली. या वेळी स्पप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे यांनी बाईक रॅलीचे उद्घाटन केलं.
एक आगळावेगळा सस्पेन्स थ्रिलर थरारक सिनेमा यानिमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची भुरळ सिनेसष्टीलाही पडली आहे. अनेक कलाकारांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. ‘वाळवी’ची खासियतही काही कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. एकंदरच लाकूड पोखरणारी ही ‘वाळवी’ सगळ्यांची मनं जिंकत आहे.
नुकताच ‘वाळवी’ हा रहास्यपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी निर्मित या चित्रपटात सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे, नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी लिखित ‘वाळवी’ हा मराठीतील पहिली थ्रिलकॅाम चित्रपट आहे.ही एक दर्जेदार कलाकृती असल्यामुळे ही वाळवी मराठी सिनेसृष्टीला सतत लागावी अशी अनेक कलारांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर भावना व्यक्त केली आहे.