मुंबई – मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापेक्षा प्रत्यक्ष रस्त्यांची पाहणी करा, तुम्हाला खड्डे बुजविण्याचे तसेच त्यांची चांगली स्थिती व्हावी यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे दिसेल, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.
रस्त्यांच्या अवस्थेवरून पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. ज्या उपनगरातील रस्ते खराब झाले आहेत तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरा करावा म्हणजे किमान रस्ते तरी ठीक होतील, अशी खोचक टीका पाटील यांनी केली होती. त्यावर शिंदे यांनी आपली माजू मांडली.
पाटील यांनी उपनगरातील रस्त्यांची पाहणी करावी. रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम किती वेगाने सुरू आहे हे त्यांच्या लक्षात येईल. केवळ घरात बसून टीका करण्यापेक्षा पाहणी करा व मगच टीका करा, अशा शब्दात शिंदे यांनी पाटील यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
करोनाच्या धोक्यामुळे अद्याप लॉकडाऊन कायम आहे. साहजिकच लोकल सेवा बंद असल्याने रस्त्यांवरचा ताण व वाहतूक वाढली आहे. तरीही खड्डे बुजवण्याचे तसेच डांबरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानेही अनेकदा कामात व्यत्यय आला असला तरी काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत सर्व कामे पूर्ण होतील, असेही शिंदे यांनी सांगितले.