करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळातही “वकील साब’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट चालू आहे. पवन कल्याणच्या या सिनेमाला लॉकडाऊनच्या काळातील सगळ्यात जास्त ओपनिंग मिळाले आहे. मात्र आता या सिनेमाचे निर्माते अडचणीत आले आहेत.
एका उद्योगपतीने निर्मात्याने विरोधात तक्रार दाखल केली आहे. या सिनेमात आपला नंबर दाखवला गेला असल्याची तक्रार हैदराबाद मधील बिझनेसमॅन अमरप्रीत यांनी केली आहे. आपला नंबर सिनेमात दाखवल्याने आपल्याला वारंवार अनाहूत फोन कॉल आणि मेसेज यायला लागले असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
“वकील साब’ मधील एका दृश्यात व्हिलन एका मुलीला एक फोटो आणि एक नंबर दाखवतो. हा नंबर आपला असल्याचा दावा बिजनेसमॅन अमरप्रीत यांनी केला आहे. आपल्या परवानगीशिवाय आपला नंबर वापरल्याबद्दल निर्मात्यांनी विरोधात कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. या प्रकरणी पोलिसांनी निर्मात्यांची चौकशी सुरू केली आहे.
“वकील साब’ हा सिनेमा 2016मध्ये रिलीज झालेल्या अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या “पिंक’ चा तेलगू रिमेक आहे. त्यामध्ये पवन कल्याण यांनी अमिताभ बच्चन यांनी केलेली भूमिका साकारली आहे. तर त्यांच्या विरोधातील बाजूचे वकील म्हणून प्रकाश राज दिसणार आहेत.