नगरसेवकांच्या रेट्यानंतर पालिकेला जाग

थकबाकीचे 53 कोटी रुपये तातडीने भरा : जलसंपदा विभागाला पत्र

पुणे – महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या मुठा उजव्या कालव्याच्या मिळकतकराची 53 कोटी रुपयांची थकबाकी तातडीने भरावी, असे पत्र पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाटबंधारे विभागास दिले आहे. तर, महापालिकेस आकारण्यात येणाऱ्या पाण्याच्या बिलातून ही रक्‍कम थकबाकी पाटबंधारे विभागाने वजा करावी, असे पत्र मिळकतकर विभागाने दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावरून नोव्हेंबरच्या मुख्यसभेत नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरत, या थकबाकीचे काय झाले? याबाबत विचारणा केली. त्यानंतर हे पत्र पाठवण्यात आले आहे.

पाटबंधारे विभागाने महापालिकेकडे तब्बल 354 कोटींची मागणी केल्यानंतर, शहराच्या हद्दीतून वाहणाऱ्या सुमारे 32 किलोमीटर लांबीच्या मुठा कालव्याला थकबाकी लावण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने सहा वर्षे मागे जात 2013 पासून या कालव्याला मिळकतकर लावला आहे. या सहा वर्षांचा कर सुमारे 53 कोटी झाला आहे. त्याबाबत पालिकेने पाटबंधारे विभागास पत्रही पाठविले होते. मात्र, त्यांच्याकडून त्या पत्राला केराची टोपली दाखवण्यात आल्याने मिळकतकर विभागाने ही थकबाकीची रक्कम पाटबंधारे विभागाने पालिकेकडे मागणी केलेल्या 354 कोटी रुपयांच्या थकबाकीमधून वसूल करावेत, असे पत्र पाणीपुरवठा विभागास दिले.

मात्र, पालिकेने या पैशांची मागणी करताच पाटबंधारे विभागाने त्यास नकार दिला. तसेच थकबाकीचा मुद्दा वेगळा असून त्याचा यात समावेश करू नये, अशी मागणी केली. मात्र, पालिकेलाच अडचण असल्याने पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, पुन्हा मुख्यसभेत पाटबंधारे विभागाशी पाणी करार करण्याचा विषय आल्यानंतर कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी या थकबाकीबाबत प्रशासनाकडे विचारणा केली. यावेळी प्रशासनाकडून या थकबाकीचे पत्र पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार हे पत्र पाठवल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.