स्कूल बस सुरक्षिततेसाठी साताऱ्यात आरटीओचा उपक्रम
सातारा – पालकांनी मुलांना ब्रॅंडेड कपड्यांप्रमाणे ब्रॅंडेड सुरक्षितता द्यावी, या उद्देशाने सातारा उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) “जागो पालक जागो” या घोषवाक्याद्वारे प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली.
येत्या काही दिवसांमध्ये मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर स्कूल बसची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन विभाग, मुख्याध्यापक आणि सदस्यांची एकत्रित बैठक होणार आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली. यंदाच्या वर्षी स्कूल बस आणि रिक्षांच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सातारा प्रादेशिक परिवहन विभाग “जागो पालक जागो” घोषवाक्याद्वारे पालकांची जनजागृती करणार आहे. पालक आपल्या मुलांना ब्रॅंडेड कपडे देतात. मात्र, मुलांचा स्कूल बस आणि रिक्षातून होणार प्रवास सुरक्षित आहे का, हे पाहण्याची जबाबदारी पालकांचीही आहे.
पालकांनी स्कूलबस चालकाला शक्यतो मोबाईल कॉल करू नये. कॉल केल्यामुळे स्कूल बसचा ड्रायव्हरचे लक्ष विचलित होण्याची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवास करीत आहेत का, याची पडताळणी पालकांनी केली पाहिजे. त्यासाठी पालकांनी एकत्रित येऊन पडताळणी करण्याचे दिवस निश्चित करून घेतले तर कोणताही चालक बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी भरणार नाहीत. तसेच पालकांनी विद्यार्थ्यांकडूनदेखील पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. ड्रायव्हर काका मोबाईलवर बोलतात का, बस अथवा रिक्षा सुस्थितीत आहे का, असे प्रश्न पालकांनी सातत्याने मुलांना विचारणे आवश्यक आहे, असे राऊत यांनी सांगितले.