वाकडेवाडी स्थानकाला अखेर मुहूर्त

दिवाळीनिमित्त आजपासून जादा बसेस स्थानकातून सुटणार


स्थानकावर आरक्षणाची सोयही उपलब्ध

पुणे – शिवाजीनगर एस.टी. स्थानकाचे स्थलांतर वाकडेवाडी येथील डेअरी फार्म या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आले आहे.

दिवाळीनिमित्त बुधवारपासून (दि.23) एस.टी.च्या जादा गाड्या वाकडेवाडी या स्थानकातून सुटणार असल्याने या स्थानकाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. याचबरोबर, पुढील काही दिवस शिवाजीनगर स्थानकातूनही गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती एस.टी. प्रशासनाने दिली आहे.

वाकडेवाडी स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे स्थानकावर बुधवारपासून तिकीट आरक्षणासाठी नव्याने सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. राज्यातील विदर्भ व मराठवाडा या भागात जाणाऱ्या गाड्या वाकडेवाडी व शिवाजीनगर या दोन्ही स्थानकांतून सुटणार आहेत. यामध्ये 22 ते 26 ऑक्‍टोबरदरम्यान एकूण बसेसपैकी वाकडेवाडी स्थानकातून सुटणाऱ्या 67 बसेस, स्वारगेट स्थानकातून 19 तर, चिंचवड स्थानकातून 24 बसचे आरक्षण फुल्ल झाले आहे.

निगडी-स्वारगेटदरम्यान मेट्रो मार्गावर शिवाजीनगर एस.टी. स्थानकाच्या आवारात मेट्रोचे भूमीगत स्थानक होणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामासाठी शिवाजीनगर बसस्थानकाचे तात्पुरते स्थलांतर वाकडेवाडी येथील 5 एकर जागेवर करण्यात आले आहे. सुरुवातीला स्थानकाचे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले होते. मात्र, स्थानकाचे काम वेळेत सुरू न झाल्याने 30 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली. परंतु, या मुदतवाढीनंतर डेअरी फार्म येथील पर्यायी स्थानकाच्या शेडचे काम पूर्ण झाले नाही. आता वाकडेवाडी स्थानकाचे काम 95 टक्‍के पूर्ण झाले असून दिवाळीच्या मुहूर्तावर बसस्थानकातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

दिवाळीनिमित्त वाकडेवाडी स्थानकातून जादा बस सोडण्यात येणार आहेत. तसेच, या ठिकाणी आरक्षणाची सोय उपलब्ध करून दिली असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार नाही. सद्यस्थितीत वाकडेवाडी व शिवाजीनगर या दोन्ही स्थानकांतून बस सोडल्या जाणार आहेत.
– यामिनी जोशी, विभाग नियंत्रक (एस.टी), पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.