वाकड पोलिसांनी पकडले साडेसहा टन रक्‍तचंदन

साडेसहा कोटींचा मुद्देमाल जप्त; आंतरराष्ट्रीय कनेक्‍शन उघड

पिंपरी (प्रतिनिधी) – वाकड पोलिसांनी 6.420 टन रक्‍तचंदन पकडले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यातून आंतरराष्ट्रीय कनेक्‍शनही उघडकीस आले आहे.

नीलेश विलास ढेरंगे (वय 35, रा. मु. पो. पिंपळगाव देपा संगमनेर अहमदनगर), एम. ए. सलीम (वय 43, रा. नंबर 62 जोग रोड कारगल कॉलनी, ता. सागर, जि. शिमोगा, कर्नाटक), विनोद प्रकाश फर्नांडिस (वय 45, रा. नाईक चाळ, एमजीम हॉस्पिटल शेजारी कातकरवाडी नौपाडा कळंबोली, नवी मुंबई), झाकीर हुसेन अब्दुल रेहमान शेख (वय 50, रा. एफ/जी/1 चिता गेट ट्रॉम्बे मुंबई), मिन्टोभाई उर्फ निर्मलसिंग मंजितसिंग गिल (वय 36, रा. मॅकडोनल्डजवळ कळंबोली, नवी मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दुबई येथे राहणाऱ्या दोघांसह आणखी चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस नाईक वंदू गिरे आणि पोलीस हवालदार राजेंद्र काळे 12 मे रोजी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी ताथवडे येथे आलेल्या एका कारला पुढे नंबर प्लेट नसल्याचे दिसून आले. कारमधील तिघांना पकडून चौकशी करण्यास सुरुवात केली असता मागे थांबलेले इतर दोघेजण अंधारात पळून गेले.

आरोपी निलेश ढेरंगे याच्या मोबाइल फोनची पाहणी केली असता त्यात रक्‍त चंदनाने भरलेल्या ट्रकचे फोटो शेअर केल्याचे दिसले. आरोपींनी रक्‍तचंदनाने भरलेला ट्रक (एमएच-40-एके-1869) ताथवडे येथे उभा केल्याचे निष्पन्न झाले. या ट्रकमध्ये रक्‍त चंदनाचे 6.420 टन वजनाचे लाकडी ओंडके आढळले.

सुरुवातीला पोलिसांनी निलेश, सलीम, विनोद या तिघांना अटक केली. त्यानंतर अन्य दोघांना नवी मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी रक्‍तचंदनासह ट्रक, कार, दोन मोबाइल फोन असा एकूण सहा कोटी, 52 लाख, 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आणखी चार आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यापैकी दोघेजण दुबई येथील आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.