बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचे रविवारी निधन झाले. वाजिद यांनी मुंबईच्या चेंबूरमधील सुरराणा सेठीया रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वाजिद खान यांच्या अचानक जाण्याने बॉलीवूडला खूप मोठा धक्का बसला असून अनेक सेलिब्रेटींनी आपण भावुक झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या सोशल मीडियावर वाजिद खान यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. वाजिद खान रुग्णालयात बेडवर बसलेले या व्हिडीओत दिसत आहेत. हे गाणे आपण आपला भाऊ साजिदसाठी समर्पित करत असल्याचे ते सुरुवातीला सांगताना ऐकू येत आहे. वाजिद खान यावेळी सुपरहिट “दबंग’ चित्रपटातील गाणे गातात. रुग्णालयातील इतर रुग्णदेखील त्यांचे हे गाणे ऐकून आनंद लुटत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. पण दुर्दैवाने वाजिद खान यांचा रुग्णालयातील हा व्हिडीओ शेवटचा व्हिडीओ ठरला.
सलमान खान आणि काजोल यांच्या 1998 मधील “प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटातून साजिद-वाजिद या जोडीने आपल्या बॉलीवूड करिअरला सुरुवात केली. त्यांनी आपल्या करिअरमधील अनेक चित्रपट सलमानसोबतच केले.
साजिद-वाजिद जोडीने गर्व, मुझसे शादी करोगी, पार्टनर, वीर आणि दबंग या चित्रपटांना संगीतबद्ध केले. अक्षयकुमारच्या रावडी राठोड चित्रपटालाही वाजिद यांनी संगीत दिले होते. यामधील त्यांनी “चिंता ता ता चिंता’ हे गाणे गायले होते.