करोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती

चाचण्यांचे प्रमाणही वाढले

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना व कुटुंबियांना चाचणी करावी लागते. तसेच विविध आस्थापनातील कामगारही मोठ्या प्रमाणात चाचणी करत आहेत. चाचणी करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, चाचणी केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. गर्दीमुळे अनेक नागरिकांना टोकन घेण्यासाठी तासन्‌ तास थांबावे लागते. प्रचंड होणाऱ्या गर्दीमुळे करोनाचे नियम पादळी तुडविले जात असल्याने रांगेतच करोनाची बाधा होण्याची शक्‍यता निर्माण होत आहे. त्यामुळे चाचणी केंद्रामध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील पाच ते सात जणांची तपासणी केली जात आहे. महापालिकेतर्फे आकुर्डी दवाखाना, तालेरा, वायसीएमएच, खराळवाडीतील बालभवन, पिंपरीतील जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, यमुनानगर, म्हेत्रे वस्ती दवाखाना, थेरगाव आणि सांगवी रुग्णालय अशा दहा ठिकाणी करोना चाचणी केंद्र आहेत.

दिवसाला सरासरी 8 ते 11 हजार संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या जात आहेत. परंतु, वाढत्या रुग्णसंख्येमुळे त्यांच्या संपर्कातील नागरिकांच्या चाचणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांना करोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र बंधनकाराक केले आहे. चाचणी करण्यासाठी नागरिक, कामगारांची गर्दी होत आहे. शहरातील चाचणी केंद्रावर पहाटेपासून टोकन घेण्यासाठी नागरिक रांगेत थांबतात. साडेनऊ वाजता चाचणी करण्यास सुरुवात केली जाते.

त्यानंतर टोकन दिले जाते. चाचणीचा नंबर येण्यासाठी पाच ते सात तास वाट पहावी लागत आहे. करोना तपासणी केंद्रावर नागरिक सामाजिक अंतराचे सर्रास उल्लंघन करतात. पाच तास एकत्र थांबतात. तपासणी करण्यापूर्वीच एकत्र थांबल्याने कोण पॉझिटिव्ह व कोण निगेटिव्ह हे समजत नाही. तपासणी करण्यासाठी आलेल्या एखादा व्यक्ति निरोगी असला तरी त्याला संपर्कात आल्याने करोना होण्याची शक्‍यता आहे. त्यातून करोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यासाठी महापालिकेने चाचणी केंद्रामध्ये वाढ करावी. चोवीस तास एखादे चाचणी केंद्र सुरू ठेवण्याची मागणी नागरिक करत आहेत.प्रति

प्रतिक्षेतील अहवालाही वाढले : 

करोनाची चाचणी करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रतिक्षेतील अहवालाचीही संख्या वाढली आहे. दिवसाला 11 हजारांच्या आसपास चाचण्या केल्या जात आहेत. पण, त्यातील प्रतिक्षेतील अहवालाचे प्रमाण जास्त आहे. दिवसाला सरासरी साडेसहा ते सात हजार जणांचे अहवाल प्रतिक्षेत राहत आहेत. आतापर्यंत शहरातील 9 लाख 54 हजार 786 जणांची चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 7 लाख 66 हजार 789 जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पालिकेतर्फे दहा ठिकाणी करोनाची चाचणी केली जात आहे. दिवसाला सरासरी 11 हजारांच्या आसपास चाचण्या होत आहेत. तपासणी केंद्रावर नागरिकांची चाचणी करून घेण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र, करोना चाचणी केंद्रात वाढ करण्याबाबत सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही.
– शिरीष पोरेड्डी, प्रवक्ते, पिं. चिं. महापालिका

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.