वर्षभरापासून इमारत बांधून तयार
खासगीकरण की पालिका चालविणार, राजकीय वाद कायम
पिंपरी – शहरातील गरीब आणि गरजू रूग्णांना अल्पदरात आवश्यक ते उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेच्या वतीने भोसरी येथे बांधलेल्या नवीन रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. संबंधित रुग्णालय खासगी संस्थेला देण्याचा घाट यापूर्वी घालण्यात आला होता. मात्र, त्याला विरोध झाल्याने सद्य:स्थितीत हा प्रस्ताव बारगळला आहे. महापालिकेला हे रुग्णालय सुरू करण्यासाठी अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. तर खासगीकरण की पालिका हा वाद अद्यापही राजकीय पातळीवर कायम आहे.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाप्रमाणेच (वायसीएम) नागरिकांच्या सोयीसाठी आणखी एक अद्ययावत रुग्णालय असावे, या उद्देशाने महापालिकेने भोसरी येथे नवीन रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयामुळे भोसरी परिसरासह दिघी, चऱ्होली, डुडुळगाव, चिंबळी, मोशी आदी या भागातून येणाऱ्या रुग्णांची मोठी सोय होणार आहे. सध्या जुन्या इमारतीत सुरू असलेल्या भोसरी रुग्णालयाची जागा अपुरी पडते आहे. तसेच, तेथे पार्किंगच्या सुविधेचा अभाव आहे.
पर्यायाने उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयात 75 खाटांची सोय आहे. महिलांची प्रसूती आणि डोळ्यांशी संबंधित शस्त्रक्रिया वगळता अन्य शस्त्रक्रिया येथे होत नाहीत. तातडीच्या उपचारांसाठी आवश्यक सुविधांचा अभाव आहे. डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे रूग्णालय प्रशासनाला सध्या विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
भोसरी रुग्णालयासाठी महापालिकेने नव्याने प्रशस्त इमारत बांधली आहे. ही रुग्णालय इमारत भोसरी सहल केंद्राजवळ आहे. संबंधित रुग्णालयात 100 खाटांची व्यवस्था असणार आहे. त्याशिवाय “मल्टीस्पेशालिटी’ सुविधा दिल्या जाणार आहेत. संबंधित रुग्णालयाची इमारत वर्षभरापूर्वीच बांधून तयार झाली आहे. संबंधित रूग्णालयाचे खासगीकरण करण्याचे नियोजन होते. मात्र, त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नगरसेवक तथा तत्कालीन विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी फेब्रुवारी-2019 मध्ये विरोध दर्शविला. तसेच, भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनीही स्वत: या प्रस्तावाला हरकत घेतली. त्यामुळे खासगीकरणाचा मुद्दा बारगळला. दरम्यान, रुग्णालय इमारत बांधून वर्षभराचा कालावधी उलटला तरी अद्याप संबंधित इमारतीत रूग्णालय सुरू झालेले नाही.
नवीन रुग्णालयातील प्रमुख सुविधा :
अस्थिरोग विभाग
दंतवैद्यक विभाग
एक्स-रे विभाग
बाह्यरुग्ण विभाग
शस्त्रक्रिया विभाग
दोन अतिदक्षता विभाग
प्रशस्त वाहनतळ
रुग्णालय परिसरात सीसीटीव्ही
भोसरी रुग्णालयासाठी बांधलेल्या नवीन इमारतीत सध्याच्या रुग्णालयातील विभाग स्थलांतरीत करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून आदेश मिळालेले नाहीत. सध्या जुन्या इमारतीत रुग्णालय सुरू आहे. नवीन रुग्णालय सुरू झाल्यानंतर रुग्णांना विविध सुविधा मिळू शकणार आहेत.
– डॉ. शैलजा भावसार, वैद्यकीय अधिकारी, भोसरी रुग्णालय.